मुंबईकरांवर सर्वात मोठं संकट! धरणांमध्ये फक्त १२.१२% पाणीसाठा शिल्लक; मिठी नदीची सफाईही अपूर्ण, पुरस्थितीचा धोका

मुंबई (pragatbharat.com) : मुंबईकरांसाठी आगामी काळ अत्यंत चिंतेचा आणि कठीण असण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जून महिन्याचे १० हून अधिक दिवस उलटून गेले तरी धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांमधील पाणीसाठा कमालीचा खालावला आहे. सध्या या तलावांमध्ये केवळ १२.१२% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, तो अवघा महिनाभर पुरेल इतकाच आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) १५ मेपासूनच लागू केलेली १० टक्के पाणीकपात अद्यापही कायम ठेवली आहे. आगामी दिवसांत धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस झाला नाही, तर मुंबईवर भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण होऊ शकते.

धरणक्षेत्रातील चिंताजनक वास्तव आणि तलावनिहाय स्थिती: मुंबईला रोज पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये ११ जून रोजी सकाळी केवळ १,७५,४६५ दशलक्ष लिटर (१२.१२%) पाणी उपलब्ध होते. पालिकेने केलेल्या नियोजनानुसार, १०% पाणीकपात लागू केल्यामुळे हा साठा १७ ऑगस्टपर्यंत टिकू शकतो; अन्यथा कपात नसती तर हा साठा केवळ ६ जुलैपर्यंतच पुरला असता. सध्या अप्पर वैतरणा धरणातील उपयुक्त साठा चक्क शून्य टक्क्यांवर पोहोचला आहे.

तलावांमधील पाणीसाठ्याची टक्केवारी खालीलप्रमाणे:

  • भातसा: ४३.३६% (सर्वाधिक साठा)
  • मोडक सागर: ३२.४४%
  • तुळशी: २४.६६%
  • मध्य वैतरणा: १४.४८%
  • विहार: ११.३३%
  • तानसा: ७.१५%
  • अप्पर वैतरणा: ०% (उपयुक्त साठा नाही)

पाऊस तोंडावर, पण ‘मिठी नदी’ अजूनही गाळातच! दुसरीकडे, मुंबईत मान्सूनचे आगमन झाले असले तरी मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या ‘मिठी नदी’च्या सफाईचे काम अजूनही अपूर्णच असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. गाळ उपसण्याची अंतिम मुदत १० जून रोजी संपली असली, तरी प्रशासनाला केवळ ८२.९३ टक्के काम पूर्ण करता आले आहे. विशेषतः पूर्व उपनगर-५२५ या विभागात सर्वाधिक दिरंगाई झाली असून तिथे केवळ ७५.९९% काम झाले आहे, म्हणजेच जवळपास २४ टक्के गाळ अजूनही नदीपात्रातच पडून आहे. नदीपात्रात शिल्लक राहिलेल्या या गाळामुळे पावसाळ्यात लगतच्या सखल परिसरामध्ये गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला असून पालिकेच्या ढिसाळ नियोजनावर नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *