
मुंबई (pragatbharat.com) : मुंबईतील अत्यंत गजबजलेल्या कुर्ला परिसरात बुधवारी रात्री गोळीबाराची थरारक घटना घडली. कुर्ला पश्चिम येथील हलाव पुलाजवळ अज्ञातांनी एका व्यक्तीवर बेछूट गोळीबार केल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. या हल्ल्यात बाबा एलप्पा पवार नावाचा इसम गंभीर जखमी झाला असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
भरवर्दळीत थरार: मिळालेल्या माहितीनुसार, बाबा एलप्पा पवार हा बुधवारी रात्री हलाव पुलावरून जात असताना दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. गोळीबाराच्या आवाजाने परिसरात एकच धावपळ उडाली. जखमी बाबा पवार हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असल्याचे समजते. हल्ल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पवारला स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याची प्रकृती सध्या “अत्यंत चिंताजनक” (Critical) असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
गँगवॉरच्या दिशेने तपास: घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. प्राथमिक तपासात हा हल्ला पूर्ववैमनस्यातून किंवा गँगवॉरमधून झाला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. ऐन वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे गोळीबार झाल्याने मुंबईतील गुन्हेगारांवरील पोलिसांचा वचक कमी झाला आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. कुर्ला परिसरात सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

