मुंबईत ‘एटीएम कार्ड ट्रॅपिंग’ गँग सक्रिय! मशीनमध्ये कार्ड अडकवून दोन नागरिकांना ८९,५०० रुपयांचा चूना; पोलिसांकडून मार्गदर्शक सूचना जारी

मुंबई (pragatbharat.com) : मुंबईत एटीएम (ATM) कार्ड धारकांना टार्गेट करणारी एक अत्यंत धोकादायक ‘कार्ड ट्रॅपिंग’ टोळी सक्रिय झाली आहे. या आठवड्यात मुंबईतील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये एका गृहिणीला आणि एका सेवानिवृत्त वृद्धाला एटीएम मशीनमध्ये कार्ड अडकवून तब्बल ८९,५०० रुपयांचा आर्थिक चूना लावण्यात आला आहे. या दोन्ही घटनांनंतर मुंबई पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदा (IT Act) आणि भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांन्वये गुन्हे दाखल केले असून, या रॅकेटचा सखोल तपास सुरू केला आहे.

पहिली घटना: चेंबूरमध्ये गृहिणीला २५ हजारांचा फटका चेंबूर येथील झामा चौक जवळील कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये संगीता कांबळे (वय ४८) या गृहिणी पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी पिन (PIN) नंबर टाकून १५,००० रुपये काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पैसे आले नाहीत आणि त्यांचे डेबिट कार्ड मशीनमध्येच अडकले. तिथे उभ्या असलेल्या एका अज्ञात तरुणाने त्यांना एटीएमवर लावलेल्या एका बनावट हेल्पलाईन नंबरवर फोन करण्यास सांगितले. संगीता यांच्या पतीने त्या नंबरवर फोन केला असता, ‘तांत्रिक कर्मचारी नंतर येईल’ असे सांगण्यात आले. जोडप्याने विश्वास ठेवून एटीएम सोडले. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या खात्यातून २०,००० आणि ५,००० रुपयांचे अनधिकृत व्यवहार झाल्याचे मेसेज आले. ते पुन्हा एटीएमवर गेले असता कार्ड गायब होते आणि तो बनावट हेल्पलाईनचा स्टिकरही तिथून हटवण्यात आला होता.

दुसरी घटना: अँटॉप हिलमध्ये वृद्धाची ६४,५०० रुपयांची फसवणूक दुसऱ्या घटनेत, ६५ वर्षीय सेवानिवृत्त पंचम यादव हे सायन कोळीवाडा पुलाजवळील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये गेले होते. ते पैसे काढत असताना एक अज्ञात व्यक्ती त्यांच्या मागे उभी होती. त्यांनी पिन टाकताच त्यांचेही कार्ड मशीनमध्ये अडकले. कार्ड निघत नसल्याने ते बँक कस्टमर केअरशी संपर्क साधून तिथून निघून गेले. मात्र, संध्याकाळपर्यंत त्यांच्या खात्यातून वडाळा पूर्व येथील एटीएममधून ४ वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे एकूण ६४,५०० रुपये काढून घेण्यात आले. पाठीमागे उभ्या असलेल्या चोराने त्यांचा पिन नंबर पाहिला आणि ते गेल्यावर मशीनमधून कार्ड काढून पैसे लांबवले, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

कसा होतो हा ‘एटीएम ट्रॅप’ घोटाळा? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे भामटे एटीएमच्या कार्ड स्लॉटमध्ये छेडछाड करून तिथे पातळ प्लास्टिक पट्टी किंवा डिंक लावतात, ज्यामुळे कार्ड आत अडकते. जेव्हा ग्राहक पैसे काढण्यासाठी पिन नंबर दाबतात, तेव्हा हे चोर मागून तो पिन नंबर चोरून पाहतात किंवा तिथे छुपे कॅमेरे लावतात. ग्राहक कार्ड अडकल्यामुळे हताश होऊन निघून गेल्यावर, हे भामटे स्लॉटमधून कार्ड बाहेर काढतात आणि चोरलेल्या पिनच्या मदतीने दुसऱ्या एटीएममधून सर्व पैसे काढून पोबारा करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *