
मुंबई (pragatbharat.com) : आपल्या मुलाला विमान कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळावी या इच्छेपोटी मुंबईतील एका ५१ वर्षीय महिलेला तब्बल ८ वर्षे अंधारात ठेवून १४.७३ लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. मुलाला कतार एअरवेजमध्ये (Qatar Airways) कॅबिन क्रू (Cabin Crew) म्हणून नोकरी लावण्याचे खोटे आमिष दाखवून एका भामट्याने हा गंडा घातला. याप्रकरणी मुंबईच्या धारावी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
शेजाऱ्याच्या मध्यस्थीने ओळख अन् पैशांची मागणी : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालाड परिसरातील पीडित महिलेची ओळख तिच्या शेजाऱ्याने पप्पू रावसाहेब घुगे नावाच्या व्यक्तीशी करून दिली होती. पप्पू घुगे याचे नागरी उड्डाण (एव्हिएशन) क्षेत्रात मोठे वजन असून तो कतार एअरवेजमध्ये नोकरी लावून देऊ शकतो, असा विश्वास शेजाऱ्याने दिला होता. यानंतर आरोपी घुगे याने नोकरीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर पैशांची गरज असल्याचे सांगत सुरुवातीला १ लाख रुपये उकळले आणि त्यानंतर कतार एअरवेजचे एक बनावट मुलाखत पत्र (Interview Letter) महिलेच्या हातात सोपवले.
वैद्यकीय चाचणी ते व्हिसाच्या नावावर ८ वर्षे लूट : हा फसवणुकीचा सिलसिला इथेच थांबला नाही. पुढील तीन ते चार वर्षांत आरोपीने मुलाखतीचे पुढील फेरे, वैद्यकीय तपासणी, व्हिसा प्रोसेसिंग आणि विमानाचे तिकीट अशा विविध कारणांचा बहाणा करत महिलेकडून टप्प्याटप्प्याने तब्बल १४.७३ लाख रुपये उकळले. मुलाला परदेशात नोकरी मिळेल या आशेने महिलाही पैसे देत राहिली. मात्र, प्रदीर्घ काळ उलटूनही नोकरी मिळत नसल्याने आणि आरोपी सतत नवीन कारणे देत असल्याने महिलेला संशय आला. तिने थेट एअरलाइन कंपनीकडे चौकशी करण्याची धमकी दिली, तेव्हा आरोपीने हे सर्व कागदपत्रे कतार एअरवेज किंवा स्पाइसजेटचे नसून आपणच तयार केलेले बनावट दस्तऐवज असल्याची कबुली दिली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत धाव घेतली असून धारावी पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



