मुंबईत ‘लिव्ह-इन’ पार्टनरची गळा चिरून निर्घृण हत्या; आसाममधून आरोपीला बेड्या, इन्स्टाग्रामवरील मैत्रीचा खळबळजनक शेवट

मुंबई (pragatbharat.com) : मुंबईतील मालवणी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक हत्याकांडाची घटना समोर आली आहे. आपल्या ३३ वर्षीय ‘लिव्ह-इन’ महिला पार्टनरची गळा चिरून निर्घृण हत्या करणाऱ्या २९ वर्षीय नराधमाला मालवणी पोलिसांनी थेट आसाममधून अटक केली आहे. मोहम्मद शमसुद्दीन अब्दुल मतीन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याने चारित्र्याच्या संशयावरून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत सलिमा खातून (वय ३३, मूळ रहिवासी कोलकाता) आणि आरोपी मतीन यांची दीड वर्षांपूर्वी इन्स्टाग्राम (Instagram) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले आणि ते मालवणी येथील न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात भाड्याच्या घरात एकत्र (Live-in Relationship) राहू लागले होते. मतीन हा पेशाने गवंडी (Mason) म्हणून काम करायचा. सलिमा ही स्वभावाने मनमोकळी असल्याने तिचे अनेक लोकांशी आणि मित्रांशी संपर्क होते, ज्यावरून मतीन तिच्यावर संशय घेत होता. या संशयामुळे आणि असुरक्षिततेमुळे त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. मतीनला हे नाते संपवून आसामला परत जायचे होते, मात्र सलिमाने त्याला विरोध करत पोलिसात तक्रार करण्याची धमकी दिली होती.

याच वादातून १९ मे रोजी दोघांमध्ये प्रचंड भांडण झाले, ज्या दरम्यान मतीनने रागाच्या भरात चाकूने सलिमाचा गळा चिरला आणि घराला कुलूप लावून मुंबईतून पळ काढला. सलिमाचा फोन बंद असल्याने तिच्या बहिणीने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, घरातून प्रचंड दुर्गंधी येऊ लागल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी दरवाजा तोडला असता सलिमाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. शवविच्छेदन अहवालात हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास चक्र फिरवून आरोपी मतीनला आसामच्या भोजाई जिल्ह्यातून अटक केली. मतीनने आपला गुन्हा कबूल केला असून, स्थानिक न्यायालयाने त्याला ६ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *