
मुंबई (pragatbharat.com) : मुंबईतील माटुंगा भागात राहणाऱ्या एका ६० वर्षीय महिलेची सायबर भामट्यांनी शेअर बाजार (Stock Market) आणि बनावट आयपीओ (Fake IPO) प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तब्बल २ कोटी २० लाख ६० हजार ४०० रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विणकामाचे (Knitting classes) वर्ग चालवून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या या महिलेला आरोपींनी पैशांचे आमिष दाखवून मार्च ते मे २०२६ दरम्यान वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरायला लावून लुटले. या प्रकरणी २७ मे रोजी मध्य परिमंडळ सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
‘व्हॉट्सअप ग्रुप’ आणि ५० हजारांची पहिली ‘ट्रीट’: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मार्च २०२६ रोजी पीडित महिलेला “Quantifying Wealth Trends” नावाच्या एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परस्पर जोडण्यात आले होते. या ग्रुपवर शेअर बाजारातील नफा आणि गुंतवणुकीच्या मोठ्या गप्पा मारल्या जात होत्या. त्यानंतर आरोपींनी ‘GSA CAP’ नावाच्या कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगून महिलेशी संपर्क साधला. सुरुवातीला तिचा विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी तिला ५०,००0 रुपये गुंतवण्यास सांगितले आणि मोबाईल अप्लिकेशन डाउनलोड करण्याची लिंक दिली. या अपमध्ये महिलेला तिच्या गुंतवणुकीवर मोठा नफा दिसत असल्याने तिचा विश्वास अधिक दृढ झाला.
अपवर दिसला तब्बल २१ कोटींचा खोटा नफा: नफ्याचा आकडा वाढत असल्याचे पाहून महिलेने आपल्या मुलाच्या नावानेही एक ट्रेडिंग खाते उघडले. आरोपींनी तयार केलेल्या या बनावट अपवर (Bogus App) महिलेच्या खात्यात तब्बल ११ कोटी रुपये, तर तिच्या मुलाच्या खात्यात १० कोटी रुपयांचा नफा आणि होल्डिंग दाखवले जात होते. प्रत्यक्षात हा केवळ एक आभासी (Virtual) आकडा होता.
‘व्हीआयपी मेंबरशिप’च्या नावाखाली आणखी १५ लाखांची मागणी: अपवर एवढा मोठा नफा दिसल्यानंतर जेव्हा महिलेने तिचे पैसे बँकेत काढण्याचा (Withdraw) प्रयत्न केला, तेव्हा तांत्रिक अडचणी दाखवून पैसे अडवण्यात आले. तिने आरोपींशी संपर्क साधला असता, “पैसे काढण्यासाठी ३ महिने लागतील, मात्र तुम्हाला तातडीने पैसे हवे असल्यास ‘VIP मेंबरशिप’ घ्यावी लागेल,” असे सांगून आरोपींनी आणखी १५ लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. तिने तात्काळ राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाईन १९३० वर संपर्क साधून तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्यान्वये फसवणूक आणि सायबर गुन्हेगारीचा गुन्हा दाखल केला आहे.


