
लोणावळा (pragatbharat.com) : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतिक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प वाहतुकीसाठी खुला होऊन अवघे ४८ तास उलटले असतानाच, पर्यटकांच्या अतिउत्साहामुळे महामार्ग पोलिसांनी दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. या मार्गावरील भव्य बोगदे आणि केबल स्टेड पुलावर वाहने थांबवून सेल्फी, फोटो आणि रिल्स काढणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू करण्यात आली असून, आतापर्यंत अनेक पर्यटकांना प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
खोपली ते कुसगाव दरम्यानचा हा १३.३ किमीचा मार्ग आधुनिक अभियांत्रिकीचा चमत्कार मानला जात आहे. यातील दोन बोगदे जगातील सर्वात रुंद बोगदे ठरले असून त्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. या भव्यतेची भुरळ पडल्याने अनेक पर्यटक सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून वेगवान महामार्गावर गाड्या उभ्या करत आहेत. शनिवारी महामार्ग पोलिसांनी अशा १५ वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यातील कलम १२२ आणि १७७ अंतर्गत कारवाई केली.
महामार्ग पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांनी स्पष्ट केले की, हा मार्ग प्रवेश नियंत्रित (Access Controlled) असून येथे वाहनांची वेगमर्यादा ताशी ८० ते १०० किमी आहे. अशा स्थितीत वाहन थांबवणे हे अपघातांना निमंत्रण देणारे ठरू शकते. MSRDC चे अधिकारी राहुल वसईकर यांनीही प्रवाशांना आवाहन केले आहे की, हा महामार्ग आहे, पर्यटनस्थळ नाही; त्यामुळे स्वतःच्या आणि इतरांच्या जिवाशी खेळू नये.
दरम्यान, या प्रकल्पाचा खर्च वाढून आता तो ७,१८० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी हा मार्ग मैलाचा दगड ठरत असताना, शिस्त पाळणे हे प्रवाशांचे कर्तव्य असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


