मुंबई विमानतळावर कस्टमची मोठी कारवाई; विमानाच्या शौचालयात लपवलेले कोट्यवधींचे सोने जप्त, तस्करीचा नवा पॅटर्न उघड

मुंबई (pragatbharat.com) : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने (Customs Department) तस्करीविरोधात मोठी मोहीम राबवत कोट्यवधींचा माल जप्त केला आहे. १ आणि २ मे रोजी करण्यात आलेल्या या विशेष कारवाईत सोने, हाय-एंड इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि विदेशी सिगारेट जप्त करण्यात आल्या असून तस्करीची धक्कादायक पद्धत समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुबईहून येणाऱ्या प्रवाशांवर पाळत ठेवून असलेल्या अधिकाऱ्यांनी एका विमानाची तांत्रिक झडती घेतली. यावेळी विमानातील मागील बाजूच्या दोन शौचालयांची तपासणी केली असता, कमोडच्या आतल्या भागात चॉकलेटी रंगाच्या टेपने गुंडाळलेली ८ पाकिटे अत्यंत चालाखीने लपवून ठेवल्याचे आढळले. या पाकिटांमध्ये सोन्याची बिस्किटे आणि इतर प्रतिबंधित वस्तू होत्या. विमानातील कर्मचारी किंवा प्रवाशांच्या लक्षात येऊ नये म्हणून ही जागा निवडण्यात आली होती.

याशिवाय, एमिरेट्स आणि स्पाईसजेटच्या विमानातून आलेल्या प्रवाशांकडून सुमारे ८४.३७ लाख रुपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, सौंदर्यप्रसाधने आणि ९५.३२ लाख रुपये किमतीचे ६९५ ग्रॅम कच्चे सोने जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी एका तस्कराला अटक करण्यात आली असून हे मोठे स्मगलिंग सिंडिकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जप्त केलेला सर्व माल सरकारी गोदामात जमा करण्यात आला असून सीमाशुल्क विभाग यामागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *