
धाराशिव / मुंबई (pragatbharat.com) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील ६ खासदारांच्या संभाव्य बंडखोरीमुळे महाराष्ट्राचे राजकारण तापलेले असतानाच, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या आगामी राजकीय भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चा आणि तर्क-वितर्कांच्या पार्श्वभूमीवर, आज खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्यांचे वडील दिवंगत पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची कालच कोर्टाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली होती. या मोठ्या धक्क्यानंतर आज ‘फादर्स डे’चे औचित्य साधत ओमराजेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
वडिलांसोबतचा जुना फोटो शेअर करत दोन ओळीत भावना व्यक्त : ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडियावर आपल्या वडिलांसोबतचा एक जुना फोटो आणि व्हिडिओ शेअर केला आहे. या पोस्टसोबत त्यांनी कवितेतील अत्यंत मार्मिक ओळी लिहिल्या आहेत: “भोवताली दाटला अंधार दु:खांचा जरी.. सुर्य सत्याचा उद्या उगवेल खात्री आहे…” या मोजक्या शब्दांत त्यांनी कोर्टाच्या निकालानंतर मनातील खदखद आणि वेदना व्यक्त केल्या आहेत. गेल्या २० वर्षांपासून निंबाळकर कुटुंब या कायदेशीर लढाईत न्यायासाठी संघर्ष करत आहे. “आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाले नाही. तरीही आम्ही हार मानणार नसून हे प्रकरण दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयात घेऊन जाणार आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
सायंकाळपर्यंत राजकीय निर्णय जाहीर होण्याची शक्यता : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कालच ओमराजे अजूनही संपर्कात असल्याचा दावा केला होता, मात्र राजकीय वर्तुळातील सूत्रांनुसार ओमराजे यांनी ठाकरे गटाची साथ सोडली असून ते आज सायंकाळपर्यंत आपला अंतिम राजकीय निर्णय जाहीर करण्याची दाट शक्यता आहे. पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालाच्या दुसऱ्याच दिवशी ‘फादर्स डे’ आल्याने ओमराजे आपल्या कुटुंबासह अत्यंत भावूक झाले आहेत. आता ते शिंदे गटात अधिकृत प्रवेश करतात की वेगळी चूल मांडतात, याकडे धाराशिवसह संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा खिळल्या आहेत.



