
मुंबई/पुणे (pragatbharat.com) : अभिनेता रितेश देशमुखच्या करिअरमधील सर्वात मोठा आणि महत्त्वाकांक्षी मानला गेलेला ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट कमाईच्या बाबतीत बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या ऐतिहासिक चित्रपटाला थिएटरमध्ये आता १८ दिवस पूर्ण झाले आहेत. हिंदीत ‘पती पत्नी और वो दो’ आणि ‘भूत बंगला’ यांसारख्या मोठ्या चित्रपटांची टक्कर असतानाही, ‘राजा शिवाजी’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपली घोडदौड यशस्वीपणे सुरू ठेवली आहे. आता हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासातील सर्वकालीन सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे.
१७ दिवसांत ८५ कोटींचा गल्ला; ‘सैराट’चा रेकॉर्ड धोक्यात: रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत या चित्रपटाने जबरदस्त ओपनिंगनंतर पहिल्या दोन आठवड्यांतच तगडी कमाई केली होती. ‘सॅकनिल्क’च्या ट्रेंड रिपोर्टनुसार, चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ५२.६५ कोटी आणि दुसऱ्या आठवड्यात २४.३० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. प्रदर्शनाच्या १५ व्या दिवशी १.४५ कोटी, १६ व्या दिवशी २.७० कोटी आणि १७ व्या दिवशी (तिसऱ्या रविवारी) ३.०५ कोटी रुपयांची दमदार कमाई करत चित्रपटाने १७ दिवसांत एकूण ८५ कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. आता दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ चित्रपटाचा ९० कोटींचा ऐतिहासिक विक्रम मोडण्यासाठी ‘राजा शिवाजी’ला केवळ ६ कोटी रुपयांची गरज आहे. हा टप्पा पार करताच हा चित्रपट भारतातील सर्वाधिक कमाई करणारा अव्वल मराठी चित्रपट ठरेल.
१०० कोटींचा टप्पा ओलांडणारे पहिले मराठी चित्रपट बनण्याचे ध्येय: ‘सैराट’चा विक्रम मागे टाकल्यानंतर बॉक्स ऑफिसवर तब्बल १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणारा पहिला मराठी चित्रपट बनण्याचे या चित्रपटाचे मुख्य ध्येय असणार आहे.
भारतात आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारे टॉप १० मराठी चित्रपट (कोईमोई डेटानुसार):
१. सैराट – ९० कोटी रुपये
२. राजा शिवाजी – ८५ कोटी रुपये (१७ दिवसांत)
३. बाईपण भारी देवा – ७६.२८ कोटी रुपये
४. वेड – ६१.२ कोटी रुपये
५. नटसम्राट – ४२ कोटी रुपये
६. पावनखिंड – ३७.७२ कोटी रुपये
७. लय भारी – ३७ कोटी रुपये
८. कट्यार काळजात घुसली – ३५ कोटी रुपये
९. ठाकरे – ३१.६ कोटी रुपये
१०. टाइमपास – ३० कोटी रुपये

