राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी मीरा बोरवणकर? रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर माजी IPS अधिकाऱ्याच्या नावाची जोरदार चर्चा

मुंबई (pragatbharat.com) : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर आता हे रिक्त पद कोणाकडे जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या अत्यंत महत्त्वाच्या पदावर राज्याच्या माजी धडाकेबाज आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त असल्याने सरकारवर टीका होत होती. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही या पदावर एखाद्या माजी आयपीएस अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची मागणी केली होती. मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत पुणे पोलीस आयुक्त आणि मुंबई क्राईम ब्रँचचे नेतृत्व अत्यंत प्रभावीपणे केले आहे, त्यामुळे त्यांच्या नावाचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचे समजते.

विशेष म्हणजे, मीरा बोरवणकर यांनी आपल्या ‘मॅडम कमिशनर’ या पुस्तकातून राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपावर परखड भाष्य केले होते, ज्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. आता अशा तडफदार अधिकाऱ्याची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी वर्णी लागणार का? याबाबत अद्याप राज्य सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी प्रशासकीय वर्तुळात या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *