राष्ट्रवादीत मोठे राजकीय भूकंप! राष्ट्रीय कार्यकारिणीवरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर; सुनील तटकरेंच्या नाराजीनंतर सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये, ‘सिलव्हर ओक’वर धाव

पुणे/मुंबई (pragatbharat.com) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) सध्या सर्व काही आलबेल नसल्याचे चित्र समोर आले असून, पक्षाच्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीवरून मोठा विसंवाद निर्माण झाला आहे. या अंतर्गत मतभेद आणि ज्येष्ठ नेत्यांमधील नाराजीची दरी वाढल्यानंतर आता सुनेत्रा पवार थेट सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी पक्षात निर्माण झालेली संभ्रमावस्था आणि वाद मिटवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, लवकरच पक्षाच्या कोअर कमिटीची (Core Committee) तातडीची बैठक बोलावली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कार्यकारिणीवरून वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी नाट्य: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला (ECI) सादर करण्यात आलेल्या अधिकृत पत्रात अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या नावासमोर त्यांच्या पदाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नव्हता. धक्कादायक बाब म्हणजे, खासदार सुनील तटकरे यांच्या नावासमोर ‘प्रदेशाध्यक्ष’ पदाचा उल्लेख गायब होता, तर दुसरीकडे अरुणाचल प्रदेशचे अध्यक्ष टोको तातूंग यांच्या नावासमोर पदाचा स्पष्ट उल्लेख होता. यामुळे सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल यांना डावलले जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आणि हे नेते नाराज झाले. या नाराजी नाट्यादरम्यान सुनील तटकरे यांनी थेट ‘सिलव्हर ओक’वर जाऊन शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय खळबळ उडाली. तटकरे यांनी ही भेट केवळ शरद पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी असल्याचे सांगितले, तर शरद पवारांनीही तटकरे व पटेल यांच्या क्षमतेचे कौतुक केले.

आमदारांचे दोन गट आणि पार्थ पवारांची कार्यपद्धती: पक्षात सध्या आमदारांमध्ये दोन स्पष्ट गट पडल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. यातील एक गट सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचे समर्थन करत आहे, तर दुसरा गट सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या पाठीशी उभा आहे. पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीला सुनेत्रा पवार यांचे पूर्ण समर्थन असल्यामुळेच ज्येष्ठ नेत्यांना डावलले जात सूर पक्षात उमटत आहे. इतकेच नव्हे तर, पक्षातील एका बड्या नेत्याने पार्थ पवार यांना समज द्यावी, या मागणीसाठी शरद पवारांची भेट घेतल्याचेही बोलले जात आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी थेट सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्याशी फोनवरून सविस्तर चर्चा केली असून, आता कोअर कमिटीच्या बैठकीत त्या या राजकीय वादाचे ‘डॅमेज कंट्रोल’ कशा प्रकारे करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *