
बीड (pragatbharat.com) : बीड जिल्ह्यातून खाकी वर्दीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. लग्नाला अवघे ११ दिवस शिल्लक असताना एका पोलीस उपनिरीक्षकाने (PSI) ऐनवेळी ‘तुमची मुलगी मला शोभत नाही’ असे म्हणत लग्नाला जाहीर नकार दिला. एवढेच नव्हे तर, मुलीच्या कुटुंबीयांना आपल्या सरकारी पिस्तुलचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही या पीएसआयवर करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर संबंधित पोलीस उपनिरीक्षकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवन निंबाळकर असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे (PSI) नाव आहे. पवन निंबाळकर हा बीड जिल्ह्यात कार्यरत असून त्याचा विवाह ठरला होता. दोन्ही कडे लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. मात्र, ऐन लग्नाच्या तोंडावर पीएसआयने घातलेल्या या गोंधळामुळे मुलीच्या कुटुंबाला मोठा मानसिक आणि आर्थिक धक्का बसला आहे.
साखरपुडा अन् खरेदीचे लाखो रुपये पाण्यात: या धक्कादायक प्रकाराबाबत आपली व्यथा मांडताना मुलीचे वडील ज्ञानेश्वर जरांगे यांनी सांगितले की, “मुलीच्या साखरपुड्यासाठीच आमचे ५ लाख रुपये खर्च झाले होते. लग्नाची तारीख जवळ आल्यामुळे आम्ही मुलीला देण्यासाठी भांडी, फर्निचर आणि इतर सर्व सामानाची खरेदी पूर्ण केली होती. साखरपुडा आणि लग्न खरेदी असा एकूण मिळून आमचा १४ ते साडेचौदा लाख रुपयांपर्यंतचा खर्च झाला आहे. लग्नाला केवळ ११ दिवस राहिले असताना त्याने अचानक नकार दिल्याने आमचे आयुष्य उद्ध्वस्त झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.”
दोन्ही बाजूंनी तक्रार, पोलिसांत खळबळ: या फसवणुकीनंतर न्यायासाठी मुलीच्या कुटुंबीयांनी चकलांबा पोलीस ठाण्यात धाव घेतली. ज्ञानेश्वर जरांगे यांच्या तक्रारीवरून पोलीस उपनिरीक्षक पवन निंबाळकर याच्या विरोधात चकलांबा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “आमच्या मुलीला न्याय मिळावा आणि लग्नाच्या तयारीसाठी आमचा झालेला खर्च परत मिळावा,” अशी मागणी मुलीच्या वडिलांनी केली आहे. तर दुसरीकडे, पोलीस उपनिरीक्षकाच्या बाजूने देखील एक उलट तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एका जबाबदार पोलीस अधिकाऱ्यानेच असा कारनामा केल्याने बीड पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

