
मुंबई (pragatbharat.com) : मुंबईतील वरळी परिसरात राहणाऱ्या एका ४५ वर्षीय महिलेला सायबर गुन्हेगारांनी १३.०८ लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इन्शुरन्स एजंट म्हणून काम करणाऱ्या या महिलेला टेलिग्राम (Telegram) ॲपच्या माध्यमातून ‘क्रिप्टोकरन्सी’ गुंतवणुकीचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सायबर भामट्यांनी ‘LTC COIN’ नावाच्या कंपनीचे प्रतिनिधी असल्याचे सांगून महिलेशी संपर्क साधला. सुरुवातीला तिला घरबसल्या अर्धवेळ नोकरी आणि सोपे ऑनलाइन टास्क देण्याचे आमिष दाखवण्यात आले. विश्वास संपादन करण्यासाठी गुन्हेगारांनी तिला सुरुवातीच्या टास्कसाठी १२० आणि ६०० रुपयांचे छोटे ‘कमिशन’ देखील दिले. यामुळे हा व्यवहार खरा असल्याचे महिलेला वाटले.
यानंतर, भामट्यांनी तिला मोठ्या गुंतवणुकीवर अधिक परतावा मिळवून देण्याचे सांगून एका बनावट क्रिप्टो डॅशबोर्डवर व्यवहार करण्यास प्रवृत्त केले. गेल्या एक महिन्यापासून सुरू असलेल्या या प्रक्रियेत महिलेने विविध बँक खात्यांमध्ये टप्प्याटप्प्याने १३ लाख ८ हजार रुपये ट्रान्सफर केले. मात्र, जेव्हा तिने आपले पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिला अधिक पैशांची मागणी करण्यात आली, त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. वरळी पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात सायबर गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

