विधानपरिषद निवडणूक निकाल २०२६: ११ पैकी १० जागांवर महायुतीचा दणदणीत विजय, नाशिकमध्ये अपक्ष पॅटर्न; संपूर्ण निकाल एका क्लिकवर

मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ११ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांच्या बहुप्रतीक्षित निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीने (BJP-Shivsena-NCP) एकतर्फी वर्चस्व गाजवत विरोधकांना भुईसपाट केले आहे. ११ पैकी तब्बल १० जागांवर महायुतीच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला असून, नाशिकच्या एका जागेवर मात्र महायुतीला मोठा धक्का बसला आहे.

एकूण १७ पैकी १६ जागांवर महायुतीचा झेंडा: राज्यातील एकूण १७ विधानपरिषद जागांपैकी ६ जागांवर महायुतीने आधीच बिनविरोध विजय मिळवला होता. आज जाहीर झालेल्या ११ जागांच्या निकालानंतर महायुतीची एकूण संख्या १६ वर पोहोचली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षाला ११, शिवसेनेला (शिंदे गट) ३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) २ जागा मिळाल्या आहेत.

मतदारसंघनिहाय सविस्तर निकाल खालीलप्रमाणे:

  • नागपूर: भाजपचे डॉ. राजीव पोतदार (६८२ मते) यांनी काँग्रेसच्या अतुल लोंढे (१३० मते) यांचा ५५२ मतांनी पराभव केला. येथे काँग्रेसची ३९ मते फुटली.
  • धाराशिव-बीड-लातूर: भाजपच्या बसवराज पाटील यांनी ८४५ मते मिळवत काँग्रेसच्या महेश देशमुख (१२४ मते) यांना पराभवाची धूळ चारली.
  • सांगली-सातारा: हाय-व्होल्टेज लढतीत महायुतीचे धैर्यशील कदम (५९३ मते) यांनी महाविकास आघाडीच्या अभयसिंह जगताप (२९२ मते) यांचा पराभव केला.
  • जळगाव: भाजपचे नंदकिशोर महाजन (५७७ हून अधिक मते) विजयी झाले, तर मविआच्या शरद तायडे यांना केवळ ५ मते मिळाली.
  • छत्रपती संभाजीनगर-जालना: भाजपचे सुहास त्र्यंबकराव शिरसाठ ४५५ मते मिळवून विजयी झाले. ठाकरे गटाचे गणेश लोखंडे १३५ मतांवर आटोपले.
  • अमरावती: भाजपचे माजी मंत्री प्रवीण पोटे (३९० मते) मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.
  • सोलापूर: भाजपचे राजेंद्र राऊत (४८३ मते) यांनी राष्ट्रवादीचे वसंतराव देशमुख (११८ मते) यांचा ३६५ मतांनी पराभव केला.
  • नांदेड: भाजपचे अमरनाथ राजूरकर (३३९ मते) यांनी मविआच्या कृष्णा पाटील आष्टीकर (८४ मते) यांचा पराभव केला.
  • भंडारा-गोंदिया: भाजपचे अविनाश ब्राह्मणकर (३०४ मते) विजयी झाले. त्यांनी काँग्रेस पाठींबित अपक्ष नरेश ईश्वरकर यांचा पराभव केला.
  • परभणी-हिंगोली: शिवसेना महायुतीचे सईद खान २४२ मते घेऊन पहिल्या पसंतीक्रमात विजयी झाले.

नाशिकमध्ये महायुतीला धक्का, अपक्ष गोकुळ गीते ठरले ‘जायंट किलर’: नाशिक मतदारसंघात महायुतीला पराभवाचा सामना करावा लागला. अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी ३५७ मते मिळवत विजयाचा ३०३ मतांचा कोटा पूर्ण केला आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे (२४८ मते) यांचा पराभव केला. या निकालानंतर मतमोजणी केंद्राबाहेर दोन्ही समर्थकांमध्ये राडा आणि धक्काबुक्की झाल्याचे पाहायला मिळाले.

या ६ जागांवर आधीच झाली होती बिनविरोध निवड: ठाण्यातून रवींद्र फाटक, यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून अनिकेत तटकरे, पुण्यातून विक्रम काकडे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरमधून अरुण लखाणी आणि अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांची आधीच बिनविरोध निवड झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *