शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाचा वणवा पेटला! बुलढाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न; पत्नीची ‘भीक मागो’ निदर्शने

बुलढाणा (pragatbharat.com) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि शेतकरी लढ्याचे प्रमुख रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी कोणत्याही जाचक अटी व शर्तींशिवाय शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाचा वणवा आता संपूर्ण विदर्भात पेटला आहे. शासनाने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत शेतकरी आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका संतप्त शेतकरी युवकाने स्वतःवर दूध आणि भाजीपाला फेकून थेट आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी तैनात असलेल्या पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या युवकाला ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

तहसीलवर चढून घोषणाबाजी, टायर जाळून सरकारचा निषेध : रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जळगाव जामोद येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी थेट तहसील कार्यालयाच्या इमारतीवर चढून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, बुलढाणा-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील धाड येथे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर टायर पेटवून रास्ता रोको आंदोलन केले. विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक भागांत शेतकरी आक्रमक झाले असून, शासनाच्या फसव्या कर्जमाफीच्या जीआरच्या (GR) होळ्या केल्या जात आहेत. शासनाच्या जाचक अटींमुळे लाखो पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहतील, त्यामुळे सरसकट कर्जमुक्ती द्यावी, या मागणीवर तुपकर ठाम आहेत.

पैशांअभावी कर्जमाफी रोखल्याचा आरोप; पत्नीचे अनोखे ‘भीक मागो’ आंदोलन : दरम्यान, राज्य शासनाकडे लाडक्या योजनांसाठी पैसे आहेत, पण जगाच्या पोशिंद्यासाठी निधी नाही, असा घणाघाती आरोप करत रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी बुलढाण्यात एक अनोखे आंदोलन केले. त्यांनी शेकडो महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांसह बुलढाणा शहरात दिवसभर भीक मागून सरकारचा निषेध केला. या भीक मागो आंदोलनातून जमा झालेला निधी सरकारला पाठवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसेंदिवस हे आंदोलन अधिक तीव्र होत चालल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *