सांस्कृतिक उपक्रमांना आणि पुरस्कारांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी; सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे मंत्रालयातील बैठकीत निर्देश

मुंबई (pragatbharat.com) : “राज्यातील समृद्ध कला, संस्कृती आणि लोकपरंपरांचा वारसा जपतांना कलाकार, लोककलावंत आणि युवा प्रतिभावंतांना अधिक सक्षम करण्यासाठी शासन पूर्णपणे कटिबद्ध आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये काळानुरूप सुधारणा करून त्या अधिक प्रभावी, पारदर्शक आणि कलाकाराभिमुख करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी,” असे निर्देश माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले. मंत्रालयात आयोजित सांस्कृतिक विभागाच्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीत ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारासह गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार आणि ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार यांच्या नियमावली व निवड प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पुरस्कारांची निवड प्रक्रिया पूर्णपणे गुणवत्ताधिष्ठित, तज्ज्ञ समित्यांच्या सहभागासह आणि कालबद्ध पद्धतीने राबविण्याचे आदेश मंत्री शेलार यांनी प्रशासनाला दिले.

पारंपरिक लोककलांना मिळणार अधिक प्रोत्साहन: राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कारांच्या व्याप्तीमध्ये सुधारणा करून कलाक्षेत्रांची संख्या वाढविण्यावर बैठकीत विशेष चर्चा झाली. विशेषतः ग्रामीण भागातील तमाशा, दशावतार, शाहिरी, खडीगंमत, संगीतबारी, भजनी मंडळे, झाडीपट्टी, नमन-खेळे आणि वहीगायन यांसारख्या पारंपरिक लोककला प्रकारांना अधिक प्रोत्साहन देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, ज्यामुळे दुर्गम भागातील लोककलावंतांना मोठा आर्थिक व सामाजिक आधार मिळणार आहे.

सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित सर्व योजनांचे आधुनिकीकरण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करावा आणि शक्य असतील ते सांस्कृतिक कार्यक्रम डिजिटल पद्धतीने आयोजित करावेत, जेणेकरून राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत आणि कलाकारांपर्यंत या योजना सहज पोहोचू शकतील, असेही मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे सांस्कृतिक क्षेत्राला एक नवी आणि आधुनिक दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *