
वाशिंग्टन/तेहरान (pragatbharat.com) : पश्चिम आशियामध्ये गेल्या साडेतीन महिन्यांपासून सुरू असलेल्या भीषण युद्धाला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात १०७ दिवस चाललेले युद्ध अधिकृतपणे संपले असून, दोन्ही देशांनी शांतता कराराला अंतिम रूप दिले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर या कराराची घोषणा करत, अमेरिका इराणच्या बंदरांवरील आपले सागरी निर्बंध (Naval Blockade) मागे घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. या ऐतिहासिक शांतता करारावर आगामी १९ जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये अधिकृत स्वाक्षरी केली जाणार आहे.
हॉर्मुझची सामुद्रधुनी शुक्रवारपासून खुली होणार:
जागतिक तेल पुरवठ्याचा एक पंचमांश (१/५) भाग वाहून नेणारा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील जलमार्ग असलेली ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) अखेर शुक्रवारपासून सर्व देशांच्या वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. करारानुसार, दोन्ही बाजूंनी युद्धजन्य मोहिमा कायमच्या थांबवण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये लेबनॉनच्या आघाडीचाही समावेश आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे की, “हा मोठा करार संपूर्ण क्षेत्रात शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित करेल”. तसेच, इराणचा अणू कार्यक्रम आणि युरेनियमच्या विल्हेवाटीबाबत पुढील ६० दिवसांत दोन्ही देश चर्चा करून अंतिम तोडगा काढतील.
इराणच्या सर्वोच्च नेतृत्वाला बसला होता मोठा फटका:
या युद्धाची सुरुवात २८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या प्रचंड क्षेपणास्त्र हल्ल्यांनी झाली होती. या सुरुवातीच्या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयतोल्ला अली खामेनी, राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारीजानी, आरजीसी कमांडर मोहम्मद पाकपूर आणि संरक्षण मंत्री अझीझ नसीरजादेह यांच्यासह इराणचे संपूर्ण अव्वल लष्करी आणि राजकीय नेतृत्व मारले गेले होते. खामेनी यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा मोजताबा खामेनी याला इराणचा नवा सर्वोच्च नेता घोषित करण्यात आले असले, तरी युद्ध सुरू झाल्यापासून तो एकदाही जाहीरपणे लोकांसमोर आलेला नाही.
या करारा मुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती घसरल्या असून, जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला आहे.


