
मोशी: पिंपरी चिंचवड शहरामधील भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनातर्फे SIR (Special Information Registration) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी आपले नाव २००२ च्या मतदार यादीशी जोडणे आवश्यक आहे. विशेषतः ज्यांचे वय ४० वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ज्यांचे नाव २००२ च्या मतदार यादीत होते, त्यांनी बीएलओ (BLO) यांच्याकडे संपर्क करून ही नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी रिव्हर रेसिडेन्सी फेज ३ क्लब हाऊसमध्ये सर्व रहिवाशांसाठी एसआयआर (SIR) कॅम्पचे आयोजन शुक्रवार दिनांक ३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २.०० पर्यंत करण्यात आले होते. यावेळी बीएलओ (BLO) राणी कांबळे, सुनिता पवार, विश्वलता मोरे, मनीषा धुमाळ, अफजल सैय्यद, रोहिदास भांगले, अमोल गजे, अमोल गायकवाड, सागर वडवले, रेखा थोपटे, वर्षाराणी भागवत, कल्पना ढोरे व नोडल अधिकारी जयश्री शिंगाडे, सुनंदा नाडेकर मॅपिंग करून घेण्यासाठी सोसायटीत उपस्थित होते.
सदरच्या कॅम्पला भेट देण्यासाठी नायब तहसीलदार विकी परदेशी तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘फ’ क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील व साप्ताहिक प्रगत भारत वृत्तपत्र संपादक दत्तात्रय कांबळे उपस्थित होते. सदर कॅम्पसाठी रिव्हर रेसिडेन्सी फेज ३ फेडरेशन टीमचे अध्यक्ष नीलेश खांडेकर, रियाज मुल्ला, बाबूलालभाई, सोसायटी मॅनेजर हरीश पाटोळे, व सोनावणे काकांसह सुरक्षा टीमचे सहकार्य लाभले. सदरच्या कॅम्पमुळे येथील रहिवाशांना त्यांचे मॅपिंग पूर्ण करता आले. तसेच मॅपिंग करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळाले, ज्यामुळे त्यांना भविष्यात मदत होईल.










