
नवी दिल्ली (pragatbharat.com) : केंद्र सरकारच्या ‘डिजिटल इंडिया’ मोहिमेला गॅस वितरण क्षेत्रात मोठे यश मिळाले असून, देशातील एलपीजी (LPG) सिलेंडरचे ऑनलाइन बुकिंग आता सुमारे ९९ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, वितरणातील पारदर्शकता वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या OTP (Delivery Authentication Code – DAC) आधारित डिलिव्हरीचे प्रमाणही ९४.५ टक्क्यांच्या पुढे गेले आहे.
पारदर्शकता आणि गळती रोखण्यावर भर: काळ्या बाजाराला चाप लावण्यासाठी आणि घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी सरकारने OTP आधारित प्रणाली अनिवार्य केली होती. सुरुवातीला याला काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या, मात्र आता ग्रामीण भागातही या प्रणालीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये हे प्रमाण ५३ टक्के होते, जे अवघ्या दोन महिन्यांत ९४ टक्क्यांवर गेले आहे. यामुळे गॅसची चोरी आणि वितरणातील गैरप्रकार कमी होण्यास मोठी मदत झाली आहे.
पुरवठा साखळी आणि सज्जता: जागतिक पातळीवर विशेषतः ‘स्ट्रेटी ऑफ होर्मुझ’ (Strait of Hormuz) परिसरातील भू-राजकीय तणावामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, सरकारने स्पष्ट केले आहे की, देशातील सर्व तेल शुद्धीकरण कारखाने (Refineries) पूर्ण क्षमतेने सुरू असून घरगुती गॅसचा तुटवडा कुठेही जाणवणार नाही. याशिवाय, मार्च २०२६ पासून आतापर्यंत ७.९७ लाख नवीन पीएनजी (PNG) जोडण्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे भविष्यात एलपीजीवरील अवलंबित्व कमी होईल.

