
पुणे (pragatbharat.com) : आज २८ एप्रिल २०२६. इतिहासाच्या पानांवर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाच्या घटनांनी सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे. मराठा साम्राज्याचा विस्तार करणारे पराक्रमी थोरले बाजीराव पेशवे यांची आज पुण्यतिथी, तर भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा देणाऱ्या ‘होम रुल लीग’ची आज स्थापना झाली होती.
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुण्यतिथी: मराठा साम्राज्याचे चौथे पेशवे आणि अजेय योद्धा म्हणून ओळखले जाणारे श्रीमंत बाजीराव बल्लाळ बाळाजी भट (थोरले बाजीराव) यांचे निधन २८ एप्रिल १७४० रोजी नर्मदा तीरावरील रावेरखेडी येथे झाले. वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी पेशवेपद भूषवणाऱ्या बाजीरावांनी आपल्या २० वर्षांच्या कारकिर्दीत एकही लढाई हरली नाही. ‘हिंदू पद पादशाही’चे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी उत्तरेत मराठ्यांचा जरब बसवला.

