
नवी दिल्ली (pragatbharat.com) : देशातील बँकिंग क्षेत्राची स्थिती अधिक भक्कम करण्यासाठी नॅशनल ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (NARCL) एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून समोर आली आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बँकांच्या ताळेबंदातील थकीत मालमत्ता (Stressed Assets) निकाली काढण्यात NARCL ने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली असून, यामुळे बँकांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मोठी मदत होत आहे.
वसुलीत ऐतिहासिक वाढ: आर्थिक वर्ष २०२५-२६ हे NARCL साठी अत्यंत यशस्वी ठरले आहे. या कालावधीत कंपनीने ४ हजार ३६४ कोटी रुपयांची वसुली केली आहे, जी कंपनीच्या आतापर्यंतच्या एकूण संचयी वसुलीच्या सुमारे ७० टक्के आहे. आतापर्यंत एकूण २३ मोठ्या खात्यांमधून ६ हजार ३४५ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली असून, हे प्रमाण मालमत्ता खरेदी किमतीच्या ४८ टक्क्यांहून अधिक आहे. सध्या इतर अनेक महत्त्वाच्या खात्यांमधील वसुलीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
बँकांना अपेक्षेपेक्षा जास्त परतावा: सर्वात सकारात्मक बाब म्हणजे, तीन मोठ्या खात्यांचा निपटारा पूर्णपणे झाला असून, त्यातून १४८ टक्के, ११५ टक्के आणि १८३ टक्के अशा दराने वसुली झाली आहे. हा वसुलीचा दर मूळ अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त असल्याने बँकांना (Lenders) मोठा आर्थिक फायदा झाला आहे. थकीत मालमत्तेचे मूल्य वाढवून ते बँकांना मिळवून देण्यात NARCL ला मोठे यश मिळत असल्याचे अर्थ मंत्रालयाने नमूद केले आहे. या कामगिरीमुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेत पारदर्शकता आणि बँकिंग व्यवहारांवर विश्वासार्हता वाढण्यास मदत होणार आहे.

