पवार विरुद्ध पवार व्हायला नको, कुटुंब एकच असावे; निकालानंतर युगेंद्र पवारांचे मोठे वक्तव्य, सुनेत्रा पवारांच्या विजयाचा दावा

बारामती (pragatbharat.com) : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. विशेषतः बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या रिंगणात सुनेत्रा पवार यांच्या विरोधात महाविकास आघाडीने कोणताही तगडा उमेदवार न दिल्याने, हा विजय एकतर्फी होईल अशी चर्चा आहे. अशातच, युगेंद्र पवार यांनी केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात नवा विषय चर्चेला आला आहे. “कुटुंब म्हणून एक कायम असावे, पवार विरुद्ध पवार असे चित्र व्हायला नको,” असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

सुनेत्रा काकींच्या विजयाचा नवा रेकॉर्ड: पत्रकार परिषदेत बोलताना युगेंद्र पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या विजयाबद्दल मोठा विश्वास व्यक्त केला. बारामती पोटनिवडणुकीत एकूण २ लाख २४ हजार मतदान झाले आहे. यापैकी सुमारे २ लाख २० हजार मते मिळवून सुनेत्रा काकी निवडून येतील आणि मताधिक्याचा एक नवा विक्रम प्रस्थापित होईल, असा दावा त्यांनी केला आहे. ४ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीत महायुतीच्या या विजयावर शिक्कामोर्तब होईल, अशी खात्रीही त्यांनी बोलून दाखवली.

पाणी प्रश्नावर विशेष भाष्य: केवळ राजकीय प्रश्नावर न थांबता, युगेंद्र पवार यांनी बारामतीच्या जिरायती पट्ट्यातील पाणी प्रश्नावरही माहिती दिली. पुरंदर उपसा सिंचन आणि जाणाई शिरसाईचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून, प्रशासकीय पातळीवर याला गती मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

पवार कुटुंबातील ऐक्यावर जोर: खासदार सुप्रिया सुळे यांनी वेळोवेळी पवार कुटुंबातील फूट ही वैचारिक असल्याचे सांगितले असले तरी, युगेंद्र पवारांनी भावनिक साद घालत ‘पवार विरुद्ध पवार’ हे राजकारण थांबावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सुप्रिया सुळे यांच्या भूमिकेवर भाष्य करताना त्यांनी पुन्हा एकदा कौटुंबिक ऐक्याचे महत्त्व अधोरेखित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *