हुतात्मा स्मारकापाशी सरकारचा अनुत्साह; राज ठाकरेंची ‘धडकी भरवणारी’ पोस्ट, मराठी अस्मितेवरून सरकारवर तोफ डागली

मुंबई (pragatbharat.com) : महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने दरवर्षी उत्साहाचे वातावरण असते, मात्र यंदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक अत्यंत संतापजनक आणि अंतर्मुख करणारी पोस्ट शेअर केली आहे. मुंबईतील हुतात्मा स्मारकाला भेट दिल्यानंतर तिथे दिसलेली सरकारी अनास्था पाहून राज ठाकरेंनी सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “सरकारला महाराष्ट्र दिनाबद्दलची अनास्था नक्की कशातून आली आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

सरकारच्या ‘त्या’ भीतीवर बोट: राज ठाकरे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, “वरती बसलेले वरिष्ठ ज्या राज्यातून येतात, त्यांच्या मनात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाल्याची सल आहे. त्यामुळे इथे गाजावाजा केला तर वरिष्ठांची खप्पामर्जी ओढवेल, अशी भीती सरकारला वाटते का?” हुतात्मा स्मारकाची सजावट नीट नव्हती आणि संपूर्ण परिसरात एक प्रकारचा सरकारी अनुत्साह जाणवत होता, असेही त्यांनी नमूद केले. इतर समाजाच्या कार्यक्रमांसाठी गालिचे अंथरणारे सरकार महाराष्ट्र दिनाबाबत मात्र ‘सुतकी’ पद्धतीने वागत असल्याचा आरोप त्यांनी केला.

मराठी माणसाला कळकळीची विनंती: केवळ सरकारवरच नाही, तर राज ठाकरेंनी मराठी माणसांच्या मानसिकतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “हुतात्मा स्मारक हे तीर्थक्षेत्रासारखे गजबजलेले असायला हवे, तिथे मराठी माणसांच्या झुंडीच्या झुंडी धडकायला हव्या होत्या. पण मराठी माणसाच्या मनात ही अनास्था का निर्माण झाली?” असा प्रश्न त्यांनी विचारला. संयुक्त महाराष्ट्राचा लढा विसरू नका आणि या स्मारकाचा विसर पडू देऊ नका, अशी विनंती त्यांनी हात जोडून केली आहे.

पुढच्या वर्षासाठी साद: मुंबईचा कणा हा मराठी माणसाचा स्वाभिमान आहे. जर आपण आपल्या भाषेचा आणि संस्कृतीचा अभिमान बाळगला, तरच बाहेरचे लोक आपला सन्मान करतील. त्यामुळे पुढच्या वर्षी १ मे रोजी मुंबई आणि राज्यभरातील मराठी बांधवांनी मोठ्या संख्येने स्मारकाला भेट द्यावी, जेणेकरून सरकारलाही याची दखल घ्यावी लागेल, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *