
पुणे (pragatbharat.com) : पुणे शहरातील सिंहगड रस्ता आणि बेंगळुरू हायवेला जोडणाऱ्या नवले पुलावर (Navale Bridge) होणारे भीषण अपघात आणि साततीची वाहतूक कोंडी यातून लवकरच पुणेकरांची सुटका होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) ‘पुणे रिंग रोड’ (Pune Ring Road) प्रकल्पांतर्गत अवजड वाहनांना शहराबाहेरूनच वळवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले आहे. विशेषतः नवले पुलावरील ताण कमी करण्यासाठी खेड शिवापूर टोल नाक्यापुढील शिवरे ते कासार-आंबोली दरम्यानचा २२ ते २५ किमीचा टप्पा पुढील दीड वर्षात प्राधान्याने पूर्ण केला जाणार आहे.
पश्चिम रिंग रोडचे ४०% काम पूर्ण; ‘या’ मार्गाने वळणार वाहतूक MSRDC च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रिंग रोडचे काम वेगाने सुरू असून आतापर्यंत एकूण ४०% काम पूर्ण झाले आहे. हा मार्ग ५ वेगवेगळ्या पॅकेजमध्ये विभागण्यात आला असून सर्व ठिकाणी एकाच वेळी काम सुरू आहे. यातील केमसेवाडी ते मोरेवाडी दरम्यानच्या २० किमीच्या दुसऱ्या टप्प्याचे काम सर्वाधिक म्हणजेच ४२% पूर्ण झाले आहे. यात दोन मोठे बोगदे, दोन लहान पूल आणि ५ पादचारी भुयारी मार्गांचा समावेश असून बोगद्यांचे खोदकाम अंतिम टप्प्यात आहे.
Expressway थेट जोडला जाणार; शहर कोंडीमुक्त होणार हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सातारा, कोल्हापूर आणि दक्षिण महाराष्ट्राकडून मुंबईच्या दिशेने जाणारी सर्व अवजड वाहने पुणे शहरात किंवा नवले पुलावर न येता, थेट शिवरे येथून रिंग रोडने कासार-आंबोली आणि पुढे पौड रस्ता मार्गे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेला जोडली जातील. यामुळे वाहनांचा इंधन आणि वेळ वाचणार असून नवले पुलावरील तीव्र उतारामुळे होणाऱ्या अपघातांचा धोका कायमचा टळणार आहे.
खडकवासला धरणावर ५०० मीटरचा पूल आणि ८ बोगदे नोव्हेंबर २०२४ मध्ये या पश्चिम कॉरिडॉरचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली होती. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये ८ मोठे बोगदे, ३ लहान पूल, २ मोठे पूल आणि थेट खडकवासला धरणाच्या बॅकवॉटरवर (फुशारकी) बांधण्यात येणारा ५०० मीटर लांबीचा भव्य पूल आकर्षण ठरणार आहे. हा रिंग रोड भोर, हवेली, मुळशी आणि मावळ या ४ तालुक्यांमधून जाणार असून प्राधान्यक्रमाच्या मार्गिका वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासन पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहे.



