
भोर/पुणे (pragatbharat.com) : पुण्यातील भोर तालुक्यातील नरसापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील संताप कायम असतानाच, आमदार रोहित पवार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारी यंत्रणांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.
रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात जी कायदेशीर पाऊले तातडीने उचलणे आवश्यक होते, ती उचलली जात नाहीत. “राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नसल्या तरी तिथे अधिकारी आहेत, त्यांनी पाठपुरावा करायला हवा होता. तसेच बालहक्क समितीनेही या घटनेची योग्य दखल घेतली नाही,” असे विधान त्यांनी केले. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकारने निष्णात वकील द्यावा, अशी मागणीही त्यांनी लावून धरली आहे. विशेष म्हणजे, भोर वकील संघटनेने आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा जो निर्णय घेतला आहे, त्याचे पवारांनी कौतुक केले.
यापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही पीडित कुटुंबाची भेट घेतली होती आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे फोनवरून बोलणे करून दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरच कुटुंबीयांनी अंत्यसंस्काराचा निर्णय घेतला होता. मात्र, पीडित मुलीच्या वडिलांनी ‘राजकीय नेत्यांनी भेटीसाठी येऊ नये’ अशी भूमिका घेतली असतानाही रोहित पवार यांची ही भेट चर्चेत आहे. आरोपीवर यापूर्वीही दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली असून, नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखून धरला होता.


