
पुणे/अहमदनगर (pragatbharat.com) : प्रसिद्ध कीर्तनकार आणि समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांच्या कन्या ज्ञानेश्वरी यांचा विवाहसोहळा आज ३ मे २०२६ रोजी अत्यंत राजेशाही थाटात संपन्न होत आहे. ज्ञानेश्वरी आणि साहिल चिलप यांचा हा विवाह सोहळा सध्या सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात तब्बल १०० एकर जागेत हा आलिशान विवाह सोहळा पार पडत आहे. या सोहळ्यासाठी भव्य मंडप आणि राजेशाही सजावट करण्यात आली असून, राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय नेते या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या साखरपुड्याच्या वेळी झालेल्या पैशांच्या उधळणीवरून महाराजांवर मोठी टीका झाली होती. मात्र, त्या टीकेला न जुमानता महाराजांनी लेकीचे लग्न अत्यंत शाही पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे.
समाजात साधेपणाचा आणि काटकसरीचा संदेश देणाऱ्या एका प्रबोधनकाराने स्वतःच्या मुलीच्या लग्नासाठी इतका मोठा खर्च करावा का? असा प्रश्न विचारत नेटिझन्सनी इंदोरीकर महाराजांवर टीकेची झोड उठवली आहे. लग्नाचे काही फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, “काय बोंबलायचे ते बोंबला” ही त्यांची वृत्ती आता चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. या विवाहसोहळ्यातील भव्यता आणि त्यासाठी झालेली व्यवस्था पाहता, हा या वर्षातील सर्वात हाय-प्रोफाइल सोहळ्यांपैकी एक ठरत आहे.


