दिल्ली हादरली! कडकडडूमा कोर्टाच्या ३० वर्षीय न्यायाधीशाची आत्महत्या; सफदरजंग परिसरात गळफास लावून संपवलं आयुष्य

नवी दिल्ली (pragatbharat.com) : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. दिल्लीतील कडकडडूमा कोर्टात कार्यरत असलेल्या एका तरुण न्यायाधीशाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे विधी आणि न्याय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अमन कुमार शर्मा (वय ३०) असे मृत न्यायाधीशाचे नाव आहे. ते दक्षिण दिल्लीतील सफदरजंग एनक्लेव्ह पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या ग्रीन पार्क मेन परिसरातील आपल्या निवासस्थानी राहत होते. रविवारी त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. अमन कुमार शर्मा यांचे मेहुणे शिवम यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच दिल्ली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा सुरू केला.

प्राथमिक तपासानुसार, अमन कुमार शर्मा यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेत कोणताही घातपात आहे का, या दिशेनेही पोलीस तपास करत आहेत; मात्र सुरुवातीच्या तपासात तसे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत. सध्या पोलीस त्यांच्या कुटुंबीयांची आणि शेजाऱ्यांची चौकशी करत असून या घटनेने न्यायालयीन वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *