
मुंबई (pragatbharat.com) : मुंबईचे वाढते तापमान लक्षात घेता आरे वसाहतीमधील जंगलाची घनता वाढवण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. आरे वसाहतीतील विविध प्राधिकरणांकडे असलेल्या सुमारे ६५ एकर मोकळ्या जागेवर येत्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले आहेत.
पालकमंत्री शेलार यांनी नुकतीच आरे वसाहतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी महानंद डेरी, फोर्स वन कार्यालय, गोरेगाव पशुवैद्यकीय रुग्णालय आणि मेट्रो भवनसाठी प्रस्तावित असलेल्या रिक्त जागांचा आढावा घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या ३०० कोटी वृक्ष लागवड मोहिमेत मुंबईचा सहभाग वाढवण्यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना या जागेवर कोणत्या प्रकारची झाडे लावता येतील आणि काही ठिकाणी ‘मियावाकी’ जंगले विकसित करता येतील का, याचा सविस्तर कृती आराखडा सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विशेष म्हणजे, मेट्रो कारशेडमधील रिक्त जागा आणि मेट्रो भवनसाठी आरक्षित असलेल्या जागेवरही वृक्षारोपण करून आरेच्या हिरवाईत भर टाकण्यावर पालकमंत्र्यांनी भर दिला आहे. यामुळे मुंबईतील वाढत्या प्रदूषणाला आळा बसण्यास आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होणार आहे.


