मुंबई पायधुनी कुटुंब मृत्यू प्रकरण: टरबूजात होते उंदीर मारण्याचे औषध; फॉरेन्सिक अहवालात ‘झिंक फॉस्फाईड’चा धक्कादायक खुलासा

मुंबई (पायधुनी) (pragatbharat.com) : दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरात एकाच कुटुंबातील चार सदस्यांच्या झालेल्या रहस्यमय मृत्यू प्रकरणाला आता नवीन वळण मिळाले आहे. न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेच्या (FSL) अहवालात या कुटुंबाने खाल्लेल्या टरबूजामध्ये आणि त्यांच्या शरीरातील अवयवांमध्ये (व्हिसेरा) ‘झिंक फॉस्फाईड’ या अत्यंत विषारी घटकाचे अंश सापडले आहेत. हे रसायन प्रामुख्याने उंदीर मारण्याच्या औषधात वापरले जाते.

पायधुनी येथील इस्माईल कुर्ते रोडवर राहणाऱ्या डोकाडिया कुटुंबात ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली होती. मृतांमध्ये अब्दुल्ला डोकाडिया, त्यांच्या पत्नी नसरिन डोकाडिया आणि त्यांच्या दोन मुली आयेशाझैनब यांचा समावेश आहे. २५ एप्रिल २०२६ रोजी रात्री नातेवाईकांसोबत जेवण झाल्यानंतर, पहाटे १ च्या सुमारास या कुटुंबाने टरबूज खाल्ले होते. त्यानंतर काही तासांतच चौघांनाही उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला. त्यांना तातडीने सर जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला.

पोलीस उपायुक्त (झोन १) प्रवीण मुंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान गोळा केलेल्या अन्नपदार्थांच्या नमुन्यांपैकी केवळ टरबूजाच्या नमुन्यातच झिंक फॉस्फाईड पॉझिटिव्ह आले आहे. इतर सर्व खाद्यपदार्थ खाण्यायोग्य असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. आता हे विष अपघाताने टरबूजात गेले की कुणीतरी जाणीवपूर्वक मिसळले, याचा शोध जे. जे. मार्ग पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे संपूर्ण मुंबईत खळबळ उडाली असून, अन्नपदार्थांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *