
मुंबई (बोरीवली) (pragatbharat.com) : बोरीवली प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) सध्या एका गंभीर घोटाळ्याच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. चक्क मृत व्यक्तींच्या नावे रिक्षा परवाने (Permits) आणि वाहन फिटनेस प्रमाणपत्रांचे नूतनीकरण केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे आरटीओ अधिकारी आणि दलाल यांच्यातील साटेलोटे पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून, याला ‘घोस्ट परमिट’ (Ghost Permit) घोटाळा म्हटले जात आहे.
आरटीओ एजंट भूपेश मिश्रा यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. मिश्रा यांच्या दाव्यानुसार, अनेक रिक्षांचे परवाने मूळ मालकांच्या गैरहजेरीत किंवा चक्क त्यांच्या मृत्यूनंतरही नूतनीकरण करण्यात आले आहेत. MH47AW0307 या क्रमांकाच्या रिक्षाचा मूळ मालक कोलकाता येथे असतानाही, त्याच्या नावावर मुंबईत परमिटचे नूतनीकरण झाले. धक्कादायक म्हणजे, राकेश कुमार गौड (MH47AJ0334) आणि राकेश पाल (MH47 X4570) या दोन रिक्षा मालकांचा मृत्यू झालेला असतानाही, त्यांच्या नावाने कागदपत्रे पूर्ण करण्यात आली.
या घोटाळ्यात साधारण १५,००० ते ६०,००० रुपयांपर्यंत लाच घेऊन मृत व्यक्तींच्या नावे प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी याप्रकरणी आरटीओ आयुक्तांकडे लेखी तक्रार केली असून, गेल्या तीन वर्षांतील सर्व व्यवहारांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी केली आहे. “मृत व्यक्तीने अर्ज करणे आणि त्याचे नूतनीकरण होणे हा प्रशासकीय व्यवस्थेचा मोठा पराभव आहे,” असे म्हात्रे यांनी म्हटले आहे.
सहायक परिवहन अधिकारी श्याम कासार यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले असून, दोषींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे. सद्यस्थितीत दोन संशयास्पद वाहने जप्त करण्यात आली असून ठाणे आरटीओने एका व्यक्तीकडे दोन परवाने आढळल्याने संबंधित रेकॉर्ड लॉक केले आहे.

