दहिसरमध्ये महाराष्ट्र दिनी शिक्षिकेची बॅग पळवणारे दोन भामटे गजाआड; मोबाईल लोकेशनमुळे आरोपींना मीरा रोडवरून अटक

मुंबई (pragatbharat.com) : दहिसर पश्चिम परिसरात महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी जात असलेल्या एका ५४ वर्षीय शिक्षिकेची बॅग हिसकावून पळणाऱ्या दोन गुन्हेगारांना एमएचबी कॉलनी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. चोरीला गेलेल्या मोबाईलच्या लोकेशनचा तांत्रिक तपास करून पोलिसांनी आरोपींना मीरा रोड परिसरातून शोधून काढले.

मिळालेल्या माहितीनुसार, फ्लोरिस झेवियर डिसिल्वा या १ मे रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास शाळेत ध्वजारोहणासाठी जात होत्या. दहिसरमधील ऐश्वर्या बिल्डिंगजवळ पांढऱ्या रंगाच्या स्कूटरवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या खांद्याला अडकवलेली बॅग हिसकावून पोबारा केला. या बॅगेत मोबाईल फोन, रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तू असा एकूण २०,५०० रुपयांचा ऐवज होता.

पोलिसांनी तपासाअंती राज रामकुमार ब्रह्मभट्ट आणि शुभम नीरज सिंग या दोन आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेला शुभम सिंग हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मुंबईत चोरी आणि लुटमारीचे २५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. धक्कादायक म्हणजे, या गुन्ह्यासाठी वापरलेली स्कूटरही त्यांनी कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरली होती. आरोपी चोरीच्या गाड्या वापरून जबरी चोरी करायचे, असे तपासात निष्पन्न झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *