
पिंपरी-चिंचवड (pragatbharat.com) : शहर परिसरात अनधिकृत बांधकामांविरोधात पिंपरी-चिंचवड महापालिकेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. रविवारी मध्यरात्री चिखली-कुदळवाडी परिसरात महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्तपणे मोठी मोहीम राबवत बेकायदा धार्मिक प्रार्थनास्थळांवर बुलडोझर चालवला. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून तणावपूर्ण शांतता पाहायला मिळत आहे.
मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाई: कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने रविवारी रात्रीपासूनच चिखली आणि कुदळवाडी परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात २१ हून अधिक अनधिकृत धार्मिक स्थळे होती. यापैकी नेमकी किती स्थळांवर कारवाई झाली याचा अधिकृत आकडा अद्याप समोर आलेला नसला तरी, राज्यातील ही एकाच रात्रीत केलेली सर्वात मोठी कारवाई असल्याचे मानले जात आहे.
ऐतिहासिक अतिक्रमण विरोधी मोहीम: यापूर्वी फेब्रुवारी २०२५ मध्ये कुदळवाडी परिसरातील सुमारे १ हजार एकर क्षेत्रावरील अनधिकृत भंगार दुकाने आणि अतिक्रमणे हटवण्यात आली होती. त्याच मोहिमेचा पुढचा टप्पा म्हणून आता धार्मिक स्थळांवरील बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता आमदार महेश लांडगे यांच्या निवासस्थानाबाहेरही खबरदारीचा उपाय म्हणून विशेष पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. सद्यस्थितीत पोलिसांची गस्त सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आहे.


