
पिंपरी-चिंचवड (pragatbharat.com) : “राजकारणात काम करताना वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा पक्ष संघटना नेहमी मोठी असते. भारतीय जनता पक्षात संघटनेपेक्षा श्रेष्ठ या जगात कोणीही नाही,” अशा शब्दांत नवनियुक्त शहर प्रभारी अॅड. श्री भरतजी पाटील यांनी कार्यकर्त्यांना शिस्तीचा आणि निष्ठेचा मंत्र दिला. मोरवाडी येथील पक्ष कार्यालयात आयोजित पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या महत्त्वपूर्ण संघटनात्मक आढावा बैठकीत ते बोलत होते.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक: प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अॅड. पाटील यांची प्रभारीपदी नियुक्ती केल्यानंतर आगामी पदवीधर व शिक्षक मतदारसंघ निवडणुकांच्या तयारीसाठी ही बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत अॅड. पाटील यांनी शहरातील पक्ष बांधणीचा सविस्तर आढावा घेतला. याप्रसंगी शहराध्यक्ष शत्रूघ्न काटे, आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे, माजी आमदार अश्विनी जगताप यांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यकर्त्यांच्या बळावर विजयाचा निर्धार: शहराध्यक्ष शत्रूघ्न काटे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला सोबत घेऊन पक्षाची ध्येयधोरणे घराघरांत पोहोचवण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे. प्रलंबित प्रश्न सोडवणे आणि पक्ष संघटना अधिक गतिमान करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. या बैठकीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला असून, आगामी निवडणुकांच्या मोर्चेबांधणीला आता वेग आला आहे.


