
चेन्नई (pragatbharat.com) : तामिळनाडूचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री आणि सुपरस्टार थलपती विजय यांच्या शपथविधी सोहळ्यातील अभिनेत्री तृषा कृष्णन हिच्या उपस्थितीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. प्रसिद्ध गायिका सुचित्रा हिने तृषावर जोरदार टीका करत विजयच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खळबळजनक वक्तव्ये केली आहेत. विजय आणि तृषा यांच्यातील वाढत्या जवळीकीमुळे विजयच्या कुटुंबात तणाव निर्माण झाल्याचा दावा सुचित्राने केला आहे.
सुचित्राने एका मुलाखतीत म्हटले की, थलपती विजयने आपल्या आई-वडिलांपासून आणि पत्नीपासून स्वतःला दूर केल्यामुळे तो एकाकी पडला आहे आणि याच काळात त्याच्या आयुष्यात तृषाचा प्रवेश झाला आहे. विजय अजूनही विवाहित असताना तृषासोबत उघडपणे फिरून चाहत्यांसमोर चुकीचा आदर्श ठेवत असल्याचेही तिने नमूद केले. या सोहळ्यात तृषा आणि विजयच्या आईने एकमेकींना मारलेली मिठी सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती, ज्यावर सुचित्राने तीव्र आक्षेप घेतला आहे.
दरम्यान, थलपती विजय आणि त्यांची पत्नी संगीता यांच्या वैवाहिक जीवनात मिठाचा खडा पडल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. संगीताने डिसेंबर २०२५ मध्ये घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचे वृत्त असून, पतीकडून झालेली फसवणूक आणि मानसिक छळ ही कारणे त्यात नमूद केली असल्याचे समजते. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ जून रोजी होणार आहे. राजकीय यश मिळवले असले तरी, वैयक्तिक आयुष्यातील या आरोप-प्रत्यारोपांमुळे थलपती विजय सध्या अडचणीत सापडले आहेत.

