
अहमदाबाद (pragatbharat.com) : आयपीएल २०२६ च्या १९ व्या हंगामात आज मंगळवारी, १२ मे रोजी गुजरात टायटन्स (GT) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या ५६ व्या सामन्यात विजय मिळवून दोन्ही संघांना प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास निश्चित करण्याची सुवर्णसंधी आहे.
आकडेवारीचा विचार केला असता, गुजरात टायटन्सचे पारडे हैदराबादवर जड असल्याचे दिसून येते. आतापर्यंत दोन्ही संघ ७ वेळा आमनेसामने आले असून त्यापैकी ५ सामन्यांत गुजरातने बाजी मारली आहे, तर हैदराबादला केवळ एकदाच विजय मिळवता आला आहे. विशेष म्हणजे, गुजरातला आज हैदराबादविरुद्ध विजयाची ‘हॅट्रिक’ साधण्याची संधी आहे. गेल्या हंगामातील दोन्ही लढतींत शुबमन गिलच्या संघाने पॅट कमिन्सच्या हैदराबादला धूळ चारली होती.
पॉइंट्स टेबलमध्ये सध्या दोन्ही संघांनी ११ पैकी ७ सामने जिंकले आहेत. मात्र, +०.७३७ च्या उत्तम नेट रनरेटसह हैदराबाद दुसऱ्या स्थानी आहे, तर गुजरातचा रनरेट +०.२२८ असल्याने ते त्यांच्या खालोखाल आहेत. आजचा सामना जिंकणारा संघ अधिकृतपणे प्लेऑफच्या उंबरठ्यावर पोहोचणार असल्याने क्रिकेट चाहत्यांना एक चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

