
मुंबई (pragatbharat.com) : अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स सेलने (ANC) मोठी कारवाई करत ४ कोटी रुपये किमतीचे हिरॉईन जप्त केले आहे. कांदिवली युनिटने अंधेरी पश्चिम येथील यारी रोड, वर्सोवा भागात सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणी दोन तस्करांना अटक करण्यात आली असून त्यांचे अमली पदार्थांच्या मोठ्या नेटवर्कशी संबंध असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अरमान अयुब मलिक (३२, रा. डेहराडून) आणि दानिश भुरा अली (२३, रा. हरिद्वार) अशी आहेत. रविवारी, १० मे रोजी पहाटे ३ वाजेच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. झडती दरम्यान त्यांच्याकडून ७६५ ग्रॅम उच्च दर्जाचे हिरॉईन जप्त करण्यात आले, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ४ कोटी रुपये आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत जगदाळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली. आरोपींविरुद्ध एनडीपीएस (NDPS) कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईत अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या मोठ्या साखळीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलीस आता या आरोपींच्या साथीदारांचा शोध घेत आहेत. गेल्या काही दिवसांत मुंबई आणि परिसरात अमली पदार्थ विरोधी कारवाया तीव्र करण्यात आल्या असून, हे त्याचेच एक यश मानले जात आहे.

