
मीरा रोड (pragatbharat.com) : अमली पदार्थ विरोधी मोहिमेत मीरा-भाईंदर गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने मोठी यश संपादन केले आहे. मुंबई आणि परिसरात सक्रिय असलेले एमडी (MD) ड्रग्ज तयार करणारे आणि पुरवठा करणारे एक मोठे रॅकेट पोलिसांनी उद्ध्वस्त केले असून, या प्रकरणी आतापर्यंत एकूण १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेने मालाडमधील मालवणी आणि मनोरी-गोराई परिसरात छापे टाकले. या कारवाईत सुमारे १३.६५ कोटी रुपयांची रसायने, यंत्रसामग्री आणि उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांच्या मते, जर या रसायनांवर प्रक्रिया झाली असती, तर सुमारे ५० किलो एमडी ड्रग्ज तयार झाले असते, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत १०० कोटी रुपयांच्या घरात आहे. ४ एप्रिल रोजी नयानगर पोलिसांनी एका दाम्पत्याकडून २.६६ कोटींचे ड्रग्ज जप्त केले होते, त्या तपासाच्या धाग्यावरून या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाला.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये फिरदोस कुरेशी, अरबाज कुरेशी, मोईज खान, मोहम्मद वसीम शेख आणि गुजरातचा इरफान कुडिया यांच्यासह इतरांचा समावेश आहे. मालवणीतील एका मॅरेज हॉलचे गोडाऊन आणि मनोरीतील फार्महाऊसवर हे ड्रग्ज बनवण्याचे काम सुरू होते. या टोळीने मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात अंमली पदार्थांचे मोठे जाळे विणले होते. पोलीस आता या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वसीमचा शोध घेत आहेत.

