
नवी मुंबई (pragatbharat.com) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बुधवारी नवी मुंबईत मोठी कारवाई करत सिडकोच्या (CIDCO) एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह त्याच्या शिपायाला लाच स्वीकारताना अटक केली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाचे मुख्य भूमी व भूमापन अधिकारी रामदास हरिभाऊ जगताप आणि त्यांचा चतुर्थ श्रेणी सहाय्यक हरेश सोनावणे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकल्पग्रस्तांच्या २२.५ टक्के योजनेअंतर्गत जमिनीच्या नोंदणीचे काम प्रलंबित होते. हे काम पूर्ण करून देण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी पदावर कार्यरत असलेल्या जगताप यांनी तक्रारदाराकडे २२,५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारताना शिपाई सोनावणे याला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सिडको कार्यालयातच सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आणि लाचेची रक्कम जप्त करण्यात आली आहे.
रामदास जगताप हे नवी मुंबई विमानतळ प्रकल्पासारख्या महत्त्वाच्या जबाबदारीवर असल्याने या कारवाईमुळे सिडको प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. दोन्ही आरोपींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्या मालमत्तेची आणि इतर प्रशासकीय कामांची चौकशी केली जात आहे. यापूर्वीही अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली आहे का, याचा तपास आता एसीबी करत आहे.

