
पुणे/अहिल्यानगर (pragatbharat.com) : देशभरात गाजत असलेल्या नीट (NEET-UG 2026) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तपास आता अधिक वेगवान झाला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) बुधवारी महाराष्ट्रात मोठी कारवाई करत अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातून तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे, तर पुण्यातील बिबवेवाडी परिसरातून एका महिलेला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगरमध्ये ताब्यात घेतलेल्या संशयितांची चौकशी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात सुरू आहे. यामध्ये धनंजय लोखंडे नावाच्या व्यक्तीचा समावेश असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही कारवाई नाशिकमध्ये अटक करण्यात आलेला संशयित शुभम खैरनार याने दिलेल्या माहितीच्या आधारे करण्यात आली आहे. खैरनारला मुंबईतील किल्ला कोर्टाने दोन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली असून, त्याला दिल्लीत नेण्यात येणार आहे.
दुसरीकडे, पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबवेवाडी येथून एका महिलेला ताब्यात घेऊन प्राथमिक चौकशीनंतर सीबीआयच्या स्वाधीन करण्यात आले आहे. ३ मे रोजी झालेली ही परीक्षा पेपरफुटीच्या आरोपानंतर रद्द करण्यात आली होती. सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लावणाऱ्या या रॅकेटमध्ये मोठे मध्यस्थ आणि वितरक सहभागी असल्याचा सीबीआयला संशय असून, त्या दिशेने कसून तपास सुरू आहे.

