
बीड (pragatbharat.com) : बीड जिल्ह्यातील ठाकर आडगाव परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रसिद्ध कीर्तनकार कैलास राजेंद्र आनंदे महाराज यांच्यावर ५ ते ७ गावगुंडांनी लोखंडी रॉड, कोयता आणि लाकडी दांडक्यांनी प्राणघातक हल्ला केला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायात संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास गेवराई शहरातील जातेगाव रोडवर ही घटना घडली. आनंदे महाराज यांना एकटे गाठून आरोपींनी त्यांच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी बीडमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून, हल्लेखोरांच्या निर्घृण कृत्यावर सर्वत्र टीका होत आहे.
कैलास आनंदे महाराज हे स्वानंद सेवा गुरुकुल चालवत असून, त्यांनी आळंदीच्या जोग महाराज वारकरी संस्थेतून शिक्षण घेतले आहे. ग्रामीण भागात वारकरी संप्रदायाचा प्रसार करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. अद्याप या हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नसले तरी, अशा प्रकारे कीर्तनकारावर झालेल्या हल्ल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, गावगुंडांवर कठोर कारवाई करण्याची मागणी वारकरी संप्रदायाकडून केली जात आहे.

