ओमानमध्ये भीषण दुर्घटना! कारमध्ये गुदमरून बांगलादेशच्या ४ सख्ख्या भावांचा मृत्यू; मृत्यूपूर्वी नातेवाईकाला पाठवला होता ‘तो’ ऑडिओ मेसेज

मस्कत (pragatbharat.com) : ओमानच्या ‘मुलाद्दा’ (Muladda) परिसरातून एक अत्यंत दुर्दैवी आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. एका पार्क केलेल्या कारमध्ये बांगलादेशच्या चार सख्ख्या भावांचे मृतदेह आढळून आल्याने ओमानमधील प्रवासी नागरिक आणि बांगलादेशात त्यांच्या गावी मोठी खळबळ उडाली आहे. गाडी सुरू असताना झालेल्या विषारी वायूच्या गळतीमुळे (Toxic Gas Leakage) या चारही जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज ओमान पोलिसांनी वर्तवला आहे.

मृतांची ओळख आणि घटनाक्रम: ‘प्रगत भारत’ला मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद राशेद, मोहम्मद साहेद, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शाहिद अशी मृत भावांची नावे असून, ते बांगलादेशच्या चट्टोग्राम (Chattogram) जिल्ह्यातील रंगुनिया येथील रहिवासी होते. हे चारही भाऊ ओमानच्या बरका भागातून मुलाद्दाच्या दिशेने प्रवासाला निघाले होते.

मृत्यूपूर्वी व्हॉट्सॲपवर पाठवला होता मेसेज: रात्री ८ वाजण्याच्या सुमारास एका भावाने आपल्या नातेवाईकाला व्हॉट्सॲपवर (WhatsApp) एक व्हॉईस मेसेज आणि लाईव्ह लोकेशन पाठवले होते. “आम्हाला कारमध्ये अत्यंत अस्वस्थ वाटत असून गाडीबाहेर पडणेही कठीण झाले आहे,” असे त्याने या मेसेजमध्ये म्हटले होते. या माहितीच्या आधारे शोध घेतला असता, पहाटे २ च्या सुमारास एका क्लिनिकजवळ पार्क केलेल्या कारमध्ये हे चारही जण मृतावस्थेत आढळून आले.

कारमधील एसी आणि गॅस गळतीचे संकट: ओमान अधिकाऱ्यांच्या प्राथमिक तपासणीनुसार, गाडीचे इंजिन आणि एसी दीर्घकाळ सुरू असल्यामुळे कारमध्ये कार्बन मोनॉक्साइड किंवा इतर विषारी गॅस जमा झाला असावा, ज्यामुळे त्यांचा श्वास गुदमरला. मात्र, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन (Autopsy) अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे प्रशासनाने सांगितले आहे. सध्या चारही मृतदेह स्थानिक शवागारात ठेवण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *