
मुंबई (pragatbharat.com) : पूर्वीच्या काळात मुलींमध्ये साधारणपणे वयाच्या १३ ते १४ वर्षांनंतर मासिक पाळी (Periods) येण्याची नैसर्गिक प्रक्रिया सुरू व्हायची. मात्र, बदलत्या काळात हा शारीरिक बदल अवघ्या आठ ते नऊ वर्षांच्या वयातच दिसून येत असल्याने अनेक पालकांसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे. वयाच्या १० व्या वर्षाआधीच मुलींना मासिक पाळी येण्याच्या (Early Puberty) या वाढत्या ट्रेंडबद्दल स्त्रीरोग सल्लागार डॉ. दीप्ती अश्विन यांनी यामागील नेमकी कारणे आणि पालकांनी घ्यायची काळजी यावर प्रकाश टाकला आहे.
वयाच्या १० वर्षांपूर्वी मासिक पाळी येण्याची मुख्य कारणे:
१. लठ्ठपणा आणि ‘लेप्टिन’ हार्मोनचा प्रभाव: आजकालच्या मुलांमध्ये जंक फूड आणि गोड पदार्थांचे अतिसेवन वाढले आहे. शरीरातील चरबी वाढल्यामुळे ‘लेप्टिन’ नावाचा संप्रेरक (Hormon) तयार होतो. हा हार्मोन मेंदूला उत्तेजित करतो, ज्यामुळे वयात येण्यास मदत करणाऱ्या इस्ट्रोजेन हार्मोन्सची क्रिया वेगवान होते आणि मुलींना लवकर मासिक पाळी येते.
२. आरोग्यविषयक समस्या आणि आजार: केवळ जीवनशैलीच नाही, तर काही वैद्यकीय कारणांमुळेही हा बदल घडू शकतो. यामध्ये थायरॉईड विकार, पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम (PCOS), अधिवृक्क ग्रंथीचे विकार, अंडाशयातील गाठी आणि मेंदूशी संबंधित दुर्मिळ विकारांमुळे शरीरातील हॉरमोनल संतुलन बिघडते.
३. प्लास्टिक आणि सौंदर्यप्रसाधनांमधील धोकादायक रसायने: आपल्या सभोवतालच्या दैनंदिन वस्तूंमधील रसायने शरीरासाठी घातक ठरत आहेत. प्लास्टिकच्या बाटल्यांमधील बीपीए (BPA) तसेच परफ्यूम आणि लोशनमध्ये आढळणारे पॅराबेन्स आणि थॅलेट्स सारखी रसायने नैसर्गिक हार्मोनल संतुलन बिघडवण्यास कारणीभूत ठरतात.
४. स्क्रीन टाईम आणि मानसिक ताण: मैदानी खेळ कमी होऊन मोबाईल आणि टीव्हीसमोर जास्त वेळ घालवल्याने शारीरिक व्यायाम थांबला आहे. पुरेशी झोप न मिळाल्यामुळे मेलाटोनिन हार्मोनची पातळी बदलते, ज्यामुळे भविष्यात PCOD चा धोका वाढतो. याशिवाय, कौटुंबिक कलहामुळे लहान मुलींवर येणारा तीव्र मानसिक ताण देखील त्यांच्या संप्रेरक ग्रंथींना अकाली उत्तेजित करतो.
पालकांसाठी तज्ज्ञांचे महत्त्वाचे सल्ले (प्रतिबंधात्मक उपाय):
- आरोग्यदायी आहार: मुलींच्या आहारात लहानपणापासूनच ताजी फळे, पालेभाज्या आणि स्थानिक घरगुती अन्नाचा समावेश करा. प्रक्रिया केलेले (Processed) पदार्थ पूर्णपणे बंद करा.
- शारीरिक हालचाली: मुलांनी दररोज किमान एक तास मैदानी खेळ खेळणे किंवा व्यायाम करणे आवश्यक आहे, जेणेकरून लठ्ठपणावर नियंत्रण राहील.
- प्लास्टिकचा वापर टाळा: गरम खाद्यपदार्थ किंवा पाणी प्लास्टिकच्या भांड्यात देण्याऐवजी स्टील किंवा काचेच्या भांड्यांचा वापर करा.
- संवाद आणि वैद्यकीय सल्ला: मुलींशी मोकळेपणाने संवाद साधून त्यांना मानसिक आधार द्या. समस्या गंभीर वाटल्यास त्वरित स्त्रीरोग तज्ज्ञांचा (Gynecologist) सल्ला घ्या.

