BJP MLA Bimla Chaudhary: मत दिलं, आता लग्न लावून देणार! भाजप महिला आमदाराची मोठी घोषणा; अविवाहित तरुणांना मागवला बायोडाटा

रेवाडी (pragatbharat.com) : निवडणुकीच्या काळात राजकीय नेते सहसा वीज, पाणी, रस्ते आणि रोजगाराची आश्वासने देतात. मात्र, हरियाणातील भाजपच्या एका महिला आमदाराने निवडणुकीदरम्यान दिलेल्या एका अनोख्या आश्वासनाची सध्या देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. “तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुमच्या घरातील अविवाहित तरुणांचे लग्न लावून देऊ”, असे आश्वासन या आमदाराने दिले होते. आता निवडणूक जिंकल्यानंतर त्यांनी हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी पाऊल उचलले असून, अविवाहित तरुणांना आपला बायोडाटा (Biodata) घेऊन भेटण्याचे जाहीर आवाहन केले आहे.

हे अनोखे आश्वासन देणाऱ्या नेत्या आहेत हरियाणातील भाजप आमदार बिमला चौधरी (MLA Bimla Chaudhary). हरियाणातील रेवाडी नगर परिषद निवडणुकीत भाजप उमेदवार विनीता पीपल यांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर आयोजित करण्यात आलेल्या जाहीर आभार सभेत आमदार बिमला चौधरी बोलत होत्या. या प्रसंगी हरियाणाच्या आरोग्यमंत्री आरती राव देखील मंचावर उपस्थित होत्या.

भर सभेत दिली लग्नाची हमी: आभार सभेत बोलताना आमदार बिमला चौधरी म्हणाल्या, “निवडणूक प्रचारादरम्यान मी जे वचन दिले होते, त्यावर मी आज जाहीर विजयानंतरही ठाम आहे. तुमच्या ओळखीतील किंवा घरातील एखादा मुलगा अविवाहित असेल आणि त्याचे लग्न जमत नसेल, तर त्याचा बायोडाटा माझ्याकडे घेऊन या. आम्ही आधीही अनेक मुलींची लग्नं लावून दिली आहेत. आता उरलेल्या अविवाहित मुलांचे घर बसवण्याची जबाबदारीही माझीच आहे.”

प्रचारसभेतच सुरू झाले होते ‘मॅरेज ब्युरो’: या रंजक विधानाची सुरुवात रेवाडी नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारसभेदरम्यान झाली होती. एका जाहीर सभेत महिला आणि युवकांना संबोधित करताना बिमला चौधरी यांनी म्हटले होते की, तुम्ही भाजप उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करा, शहराच्या विकासाची जबाबदारी आमची असेलच; पण ज्या युवकांची लग्ने होत नाहीत, त्यांचे लग्न लावून देण्याची हमीही मी घेते. त्यांच्या या वक्तव्यानंतर संपूर्ण सभेत एकच हशा पिकला होता, मात्र आता आमदारांनी प्रत्यक्षात बायोडाटा मागवल्याने तरुणांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

आमदार बिमला चौधरी यांचा राजकीय प्रवास: बिमला चौधरी या हरियाणा भाजपमधील एक चर्चित आणि डॅशिंग चेहरा मानल्या जातात. त्या पटौदी (SC राखीव) मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. २०१४ च्या निवडणुकीत त्यांनी स्वतः निरक्षर असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते. मात्र, शिक्षणाची जिद्द न सोडता त्यांनी २०१८ मध्ये NIOS च्या माध्यमातून दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार पर्ल चौधरी यांचा पराभव करत पुन्हा एकदा विजय मिळवला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *