हंतापाठोपाठ ‘इबोला’ व्हायरसचा हाहाकार! २४५ हून अधिक रुग्ण, ८० जणांचा मृत्यू; WHO कडून ग्लोबल हेल्थ एमर्जन्सी घोषित

किन्शासा/नवी दिल्ली (pragatbharat.com) : जग अजूनही हंताव्हायरसच्या (Hantavirus) संकटाशी मुकाबला करत असतानाच, आता दुसऱ्या एका अत्यंत जीवघेण्या आणि भयंकर व्हायरसने जगाची चिंता वाढवली आहे. आफ्रिकेतील काँगो देशात ‘इबोला’ (Ebola Virus) विषाणूचा मोठा उद्रेक झाला असून आतापर्यंत २४५ हून अधिक संशयित रुग्ण आढळले आहेत, तर तब्बल ८० जणांचा मृत्यू झाला आहे. या भयावह परिस्थितीमुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) देखील चिंता व्यक्त केली असून आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘ग्लोबल हेल्थ एमर्जन्सी’ (जागतिक आरोग्य आणीबाणी) जाहीर केली आहे.

काँगोच्या इतुरी प्रांतात उद्रेक; आरोग्य यंत्रणा सतर्क: आफ्रिकेची सर्वोच्च सार्वजनिक आरोग्य संस्था ‘आफ्रिका सीडीसी’ने (Africa CDC) दिलेल्या माहितीनुसार, काँगोच्या इतुरी प्रांतात इबोलाचा प्रादुर्भाव झाल्याची अधिकृत पुष्टी झाली आहे. येथील मोंगवालू आणि रवामपारा या आरोग्य क्षेत्रांमध्ये सर्वाधिक संसर्ग पसरला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी सांगितले की, प्राथमिक चाचणीत या विषाणूचे अस्तित्व स्पष्ट झाले नव्हते, मात्र नंतर प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये इबोला विषाणूची पुष्टी झाली आहे.

इबोला किती धोकादायक आणि कसा पसरतो? वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, इबोला हा एक अत्यंत संसर्गजन्य आणि प्राणघातक आजार आहे. हा विषाणू संक्रमित व्यक्तीचे रक्त, लाळ, उलटी, वीर्य आणि इतर शारीरिक द्रव्यांच्या थेट संपर्कात आल्यामुळे पसरतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, इबोला हा रोग प्रामुख्याने इबोला विषाणू, सुदान विषाणू आणि बुंदीबुग्यो (Bundibugyo) विषाणूमुळे पसरतो. काँगोला यापूर्वी इबोलाचा सामना करण्याचा अनुभव असला, तरी यावेळचा विषाणूचा प्रकार (Variant) काहीसा वेगळा असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे.

शेजारील देशांमध्ये प्रसार होण्याचा मोठा धोका: इबोलाचा प्रादुर्भाव झालेला काँगोचा भाग युगांडा आणि दक्षिण सुदान देशांच्या सीमेजवळ आहे. शेजारील युगांडामध्येही काँगोमधून आलेल्या एका नागरिकाचा रुग्णालयात मृत्यू झाला असून त्याला बुंदीबुग्यो विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. मोंगवालू परिसरातील खाणकाम क्षेत्र आणि लोकांच्या सततच्या आंतरराष्ट्रीय येण्याजाण्यामुळे हा संसर्ग शेजारील देशांमध्ये वेगाने पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानच्या आरोग्य अधिकाऱ्यांची संयुक्त राष्ट्रांच्या (UN) संस्थांसोबत तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *