
मुंबई (pragatbharat.com) : रेल्वे प्रवासादरम्यान लोकल किंवा लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये धावत्या ट्रेनमध्ये खिडकीतून रुमाल, टॉवेल किंवा पिशव्या फेकून सीटवर बेकायदेशीर ताबा मिळवणाऱ्या ‘टॉवेल बहाद्दरांवर’ (Towel-spreading gangs) मध्य रेल्वेने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. रेल्वे सुरक्षा बलाने (RPF) प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि सुलभ प्रवासासाठी ‘ऑल-आउट वॉर’ सुरू केले असून, अवघ्या चार महिन्यांत हजारो अनधिकृत सीट ब्लॉकर्स आणि दलालांना बेड्या ठोकल्या आहेत.
४ महिन्यांत १,३६७ हून अधिक जणांना अटक: मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (CPRO) डॉ. स्वप्नील निला यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरपीएफच्या पथकांनी ‘ऑपरेशन उपलब्ध’ (Operation Uplabdh) अंतर्गत आरक्षित डब्यांमध्ये अनधिकृत प्रवेश करणाऱ्या आणि बेकायदेशीरपणे सीट अडवणाऱ्यांविरुद्ध अचानक छापे टाकून आक्रमक मोहीम राबवली. जानेवारी ते एप्रिल २०२६ या चार महिन्यांच्या कालावधीत मध्य रेल्वेवर एकूण १,३७७ गुन्हे नोंदवण्यात आले असून १,३६७ जणांना अटक करण्यात आली आहे.
मुंबई आणि नागपूर विभाग ठरले हॉटस्पॉट: या संपूर्ण मोहिमेत सर्वाधिक कारवाई मुंबई विभागात झाली असून, एकट्या मुंबईतून तब्बल ९९८ गुन्हे दाखल करून ९८६ जणांना अटक करण्यात आली आहे. कन्फर्म तिकीट असलेल्या खऱ्या प्रवाशांना त्रास देणाऱ्या आणि त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या या टोळ्यांचा बंदोबस्त केल्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.
दुसरीकडे, अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात केलेल्या कारवाईत पोलिसांनी २१.९२ लाख रुपयांचा गांजा जप्त करून १० आरोपींना अटक केली आहे, ज्यामध्ये नागपूर विभाग हा ड्रग्ज तस्करीचा सर्वात मोठा हॉटस्पॉट म्हणून समोर आला आहे.
३ कोटींचे हरवलेले सामान प्रवाशांना परत: या ४ महिन्यांच्या विशेष सुरक्षा मोहिमेदरम्यान आरपीएफने केवळ गुन्हेगारांवरच कारवाई केली नाही, तर प्रवाशांना मोठी मदतही केली आहे. रेल्वे प्रवासात प्रवाशांचे विसरलेले किंवा हरवलेले ३ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सामान सुरक्षितपणे शोधून ते मूळ मालकांना परत करण्यात आले आहे. तसेच ४३.६७ लाख रुपयांचा अवैध मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

