पुण्यात कार चालकाचा थरकाप उडवणारा निष्काळजीपणा! ६ दुचाकी आणि रिक्षाला उडवले; ४ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू, चालक अमोल गेगडे अटक

पुणे (pragatbharat.com) : पुणे आणि परिसरातून वाहनांच्या बेजबाबदार आणि अतिवेगामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जाण्याच्या घटना थांबताना दिसत नाहीत. पुण्यातून आता एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी अपघाताची घटना समोर आली आहे. खडकवासला गावात एका बेजबाबदार कार चालकाने आपल्या ताब्यातील ‘टाटा पंच’ कार भरधाव वेगाने आणि हयगयीने चालवून तब्बल ६ दुचाकी आणि एका रिक्षाला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एका ४ वर्षीय चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, ३ ते ४ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. हा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार थेट दुकानात घुसली: मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास MH 25 BH 6489 क्रमांकाची टाटा पंच कार घेऊन चालक आणि त्याचा साथीदार खडकवासला धरणाच्या दिशेने चालले होते. खडकवासला गावाजवळ येताच चालकाचे कारवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले. या भरधाव कारने रस्त्यावरील वाहनांना पाडत थेट विरुद्ध बाजूच्या एका दुकानात धडक घेतली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये ६ दुचाकी वाहनांचा आणि रिक्षाचा चक्काचूर झाला. या अपघातामुळे खडकवासला परिसरात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

४ वर्षीय यशराजची प्राणज्योत मालवली: या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ४ वर्षांच्या यशराज निलेश कांबळे या चिमुरड्याला तातडीने सिंहगड रोडवरील जगताप रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान सायंकाळी ६:४० वाजण्याच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. यशराजच्या या दुर्दैवी आणि अकाली निधनामुळे कांबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कार चालकासह साथीदार पोलिसांच्या ताब्यात: अपघातानंतर हवेली पोलिसांनी (नांदेड पोलीस स्टेशन) तत्परता दाखवत कार चालक अमोल गोरक्षनाथ गेगडे (व्यवसाय- शेती) याला अटक केली आहे. तसेच कारमध्ये त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्र प्रकाश तात्याराम कोठारे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे दोघेही दारूच्या नशेत होते का, हे तपासण्यासाठी पोलिसांनी त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नांदेड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *