पुण्यात काळजाचा थरकाप! आरोपींना पकडायला गेलेल्या पोलिसांवरच गोळीबार; उसाच्या शेतात रात्रभर थरारक सर्च ऑपरेशन

पुणे/रांजणगाव (pragatbharat.com) : पुणे जिल्ह्यात गुन्हेगारांची हिंमत किती टोकाला पोहोचली आहे, याचा एक अत्यंत थरारक आणि भयानक प्रकार समोर आला आहे. चऱ्होली गोळीबार प्रकरणातील फरार आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या विशेष पथकावरच गुंडांनी थेट गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यानंतर पोलीस आणि आरोपींमध्ये अष्टविनायक रोडवर फिल्मी स्टाईलने थरारक पाठलाग रंगला. या घटनेमुळे शिरूर तालुक्यातील सोनेसांगवी, वाघाळे आणि पिंपरी दुमाला परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पोलिसांची चाहूल लागताच थरारक पाठलाग: मिळालेल्या माहितीनुसार, चऱ्होलीतील गोळीबार प्रकरणातील संशयित आरोपी शिरूर तालुक्यातील सोनेसांगवी येथील शेळके वस्ती परिसरात लपल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या पथकाने या भागात सापळा रचला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच आरोपींनी दुचाकीवरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनीही त्यांचा पाठलाग सुरू केला आणि अष्टविनायक रोडवरील गणपती चौक परिसरात दोन्ही बाजूंनी जोरदार थरार पाहायला मिळाला.

दोन्ही बाजूने हवेत गोळीबार? पाठलाग सुरू असताना अचानक आरोपींची दुचाकी बंद पडली. त्यामुळे त्यांनी वाहन रस्त्यावरच सोडून दिले आणि अंधाराचा फायदा घेत उसाच्या शेतांच्या दिशेने धाव घेतली. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पळून जाताना आरोपींनी पोलिसांना घाबरवण्यासाठी हवेत गोळीबार केला, ज्याच्या प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही स्वसंरक्षणासाठी हवेत काही राऊंड फायर केले. मात्र, या कथित गोळीबाराच्या वृत्ताला पोलीस प्रशासनाकडून अद्याप अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

उसाच्या शेतात रात्रभर सर्च ऑपरेशन; ‘शेखर जाधव’चे नाव चर्चेत: घटनेची माहिती मिळताच रांजणगाव एमआयडीसी पोलीस, पुणे ग्रामीण पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि पिंपरी-चिंचवड पोलिसांची अतिरिक्त पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. संपूर्ण परिसरात कडक नाकाबंदी करण्यात आली होती. गुंड उसाच्या शेतात लपल्याने पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घालून रात्रभर व्यापक ‘सर्च ऑपरेशन’ राबवले. फरार आरोपींमध्ये शेखर संभाजी जाधव या सराईत गुंडाचे नाव प्रामुख्याने चर्चेत असून, त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर पुणे जिल्ह्यातील कोयता गँग आणि स्थानिक भाई-दादांच्या टोळ्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *