
पुणे/लातूर (pragatbharat.com) : देशभरात प्रचंड गाजत असलेल्या राष्ट्रीय पात्रता नि प्रवेश परीक्षेशी (NEET) संबंधित पेपरफुटी आणि गैरव्यवहार प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणाचे धागेदोरे पुन्हा एकदा महाराष्ट्रातील लातूरपर्यंत पोहोचले असून, लातूरमधील प्रसिद्ध ‘आरसीसी क्लासेस’चे (RCC Classes) संचालक आणि केमिस्ट्रीचे प्राध्यापक प्रा. शिवराज मोटेगावकर यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अखेर अटक केली आहे. या धडक कारवाईमुळे शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पुण्यात रात्रभर चौकशी, लातूरमध्ये तळ: मिळालेल्या अत्यंत विश्वसनीय माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून सीबीआयचे (CBI) एक विशेष पथक लातूरमध्ये तळ ठोकून आहे. या दरम्यान, प्रा. मोटेगावकर यांना ताब्यात घेऊन पुण्याच्या सीबीआय कार्यालयात आणण्यात आले होते. तिथे दोन दिवस त्यांची कसून चौकशी करण्यात आली आणि रात्रभर प्रश्नांचा मारा केल्यानंतर आज सकाळी पुन्हा चौकशी करत त्यांना रीतसर अटक करण्यात आली. दुसरीकडे, लातूरमधील आरसीसी क्लासेसच्या परिसरातही सीबीआयच्या इतर पथकांकडून संबंधित व्यक्तींची आणि कर्मचाऱ्यांची कसून चौकशी सुरू आहे.
गेस पेपरमधील ४२ प्रश्न तंतोतंत; संशयाची सुई अधिक गडद: या तपासादरम्यान नांदेड, नाशिक आणि पुणे येथूनही सीबीआयच्या हाती अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे आणि पुरावे लागले आहेत. विशेष म्हणजे, एका खाजगी गेस पेपरमधील तब्बल ४२ प्रश्न नीट (NEET) परीक्षेत तंतोतंत आल्याची गंभीर तक्रार समोर आल्यानंतर खाजगी कोचिंग क्लासेसच्या भूमिकेवर संशयाची सुई रोखली गेली होती. या प्रकरणातील प्रमुख आरोपी पी. व्ही. कुलकर्णी आणि काही खाजगी क्लासेसच्या संचालकांमध्ये असलेल्या आर्थिक आणि व्यावसायिक संबंधांचा शोध सीबीआयचे अधिकारी घेत आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रा. शिवराज मोटेगावकर यांच्या लातूर येथील घराबाहेर सध्या मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, या पेपरफुटी गैरव्यवहारात आणखी काही बड्या नामांकित व्यक्तींची नावे समोर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.


