
मुंबई (pragatbharat.com) : देशातील ‘नीट’ (NEET) परीक्षेतील कथित गोंधळाची चर्चा ताजी असतानाच, आता महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या ‘एमएचटी-सीईटी’ (MHT-CET) परीक्षेच्या निकालावरही समाजमाध्यमांवर संशय व्यक्त केला जात आहे. बारावीत अवघे ५० ते ६० टक्के गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेत चक्क ९९ ते १०० पर्सेंटाइल मिळाल्याचा दावा करणारे काही स्क्रीनशॉट व्हायरल झाले होते. या गंभीर प्रकरणावर आता राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) अधिकृतपणे मौन सोडले असून सर्व दावे फेटाळून लावले आहेत.
काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्या पोस्टमुळे खळबळ काँग्रेस नेते सचिन सावंत यांच्यासह काही नेत्यांनी आणि सोशल मीडिया युजर्सनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वर एका कथित गुणवत्ता यादीचे स्क्रीनशॉट शेअर केले होते. या यादीमध्ये बारावीत सरासरी किंवा अगदी कमी गुण मिळवणारे विद्यार्थी सीईटीच्या निकालात थेट राज्याच्या ‘टॉपर’च्या यादीत कसे पोहोचले? डेटामध्ये काही छेडछाड किंवा गुणवत्तेत फेरफार झाला आहे का? असे गंभीर प्रश्न उपस्थित करत या संपूर्ण प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर बोट ठेवले होते. यामुळे लाखो विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
व्हायरल झालेली यादी बोगस; सीईटी सेलचा निर्वाळा या वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर, सीईटी सेलने तातडीने अधिकृत पत्रक प्रसिद्ध करून समाजमाध्यमांवर फिरणारी कथित अस्थायी गुणवत्ता यादी पूर्णपणे चुकीची आणि बोगस असल्याचे स्पष्ट केले आहे. “व्हायरल झालेल्या इमेजेसचा किंवा डेटाचा अधिकृत गुणवत्ता यादीशी कोणताही संबंध नाही. ही परीक्षा पूर्णपणे संगणकाधारित (Computer Based Test) असून गुणदानासाठी अत्यंत पारदर्शक ‘नॉर्मलायझेशन’ (Normalization Process) पद्धतीचा वापर केला जातो. त्यामुळे सीईटीच्या निकालात अशा प्रकारचा कोणताही घोटाळा किंवा फेरफार होणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य आहे,” असे सीईटी कक्षाने ठामपणे सांगितले आहे. तसेच, विद्यार्थ्यांनी अशा कोणत्याही अफवांवर आणि बोगस स्क्रीनशॉटवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

